बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांनी वयाच्या अवघ्या ५४व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या अकाली एक्झिटनंतर कलाविश्वात एक प्रकारची पोकळीच निर्माण झाली. किंबहुना सध्याच्या घडीलाही श्रीदेवी यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे ठेवण्यात आले असून, तेथे येणाऱ्या अनेकांना या गोष्टीवर विश्वास ठेवणंही कठीण जात आहे. श्रीदेवी याच्या निधनाच्याच चर्चा सर्वत्र सुरु असून, त्याविषयी अनेकांनी नकारात्मक सूरही आळवला. या सर्व प्रकारावर अभिनेते अन्नू कपूर यांनी आपलं मत मांडलं.

श्रीदेवी यांच्या निधनानंतर त्यांच्या मृत्यूच्या कारणाविषयी अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात झाली. त्यानंतर माध्यमांनी ज्या पद्धतीने या बातमीला अतिरंजितपणे सादर केलं ते पाहता अनेकांचीच आगपाखड झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडियावर बऱ्याच जणांनी नाराजीचा सुर आळवत खोचक शब्दांमध्ये माध्यमांवर निशाणा साधला. याविषयीच अभिनेते अन्नू कपूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

वाचा : BLOG : या अभिनेत्रींचं धक्कादायक जाणे…

श्रीदेवी यांच्या अंत्यदर्शनासाठी सेलिब्रेशन स्पोर्ट्स क्लब येथे आलेल्या कपूर यांना ज्यावेळी याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा या प्रश्नाचे उत्तर देत ते म्हणाले, ‘विविध विषयांवर प्रश्न उपस्थित करणं हे माध्यमांचं कामच आहे. त्या प्रश्नांना किती महत्त्व द्यायचं, त्यांचा किती गांभीर्याने विचार करायचा हा निर्णय ज्याचा त्याने घ्यावा. या गोष्टींवर चर्चा करण्याची ही योग्य वेळ नाही. कपूर कुटुंबिय या क्षणाला खूप दु:खात आहेत. तरुण वयातच मुलींच्या डोक्यावरचं मायेचं छत्र हरपलं आहे, त्यामुळे सध्या त्यांना आधार देण्याचीच जास्त गरज आहे.’ अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावर अन्नू कपूर यांनी आपलं मत मांडल्यामुळे निदान आतातरी या सर्व वायफळ चर्चांना पूर्णविराम मिळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.