किडनीच्या समस्येमुळे मागील काही दिवसांपासून रुग्णालयात दाखल असलेले अभिनेते दिलीप कुमार यांची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे. मुंबईच्या लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर काही दिवसांपासून उपचार सुरु असून सध्याच्या घडीला त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

‘दिलीप कुमार यांची प्रकृती ठिक असून त्यांच्यात दिवसागणिक बरीच सुधारणा होत आहे. पुन्हा एकदा त्यांचं स्वास्थ्य पूर्वपदावर येत असून आता श्वास घेण्यास त्यांना त्रास होत नाहीये. ते पूर्णपणे शुद्धीवर आहेत. त्यांच्या रक्तातील क्रिटीनिनची पातळी कमी झाली आहे मात्र ते व्हेंटिलेटरवर नाहीत’, असं रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीपत्रकात म्हटलं आहे. असं असलं तरीही त्यांना डॉक्टरांच्या निरिक्षणांतर्गत अद्यापही अतिदक्षता विभागातच ठेवण्यात आलं आहे. दिलीप कुमार यांना रुग्णालयातून कधी सोडणार आहेत यावर अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. पण, तरीही त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं कळल्यामुळे अनेकांना दिलासा मिळाला आहे.

आज त्यांच्या ट्विटर अकाऊंटद्वारे करण्यात आलेल्या एका ट्विटमधूनही याबाबतची माहिती देण्यात आली. ‘चोवीस तास डॉक्टरांची एक टीम दिलीपजींची काळजी घेत आहे. त्यामुळे दिलीप साहेबांची तब्येत आता सुधारत असून, त्यांच्यासाठी प्रार्थना करा’, असं त्या ट्विटमध्ये लिहिण्यात आलं होतं.

गेल्या काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीतील बरेच कलाकार आणि चाहत्यांनी या अभिनेत्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली होती. सोशल मीडियावरही अनेकांनी ट्विट आणि काही पोस्ट करत त्यांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त केली होती. पण, आता त्यांची प्रकृती सुधारल्याचं कळल्यामुळे अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.