विनोदाची विशिष्ट शैली आणि डान्सच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकणारा बॉलिवूडचा हिरो नंबर १ म्हणजेच अभिनेता गोविंदाचा आज २१ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. ८० ते ९०च्या काळात गोविंदाने हिट चित्रपटांची अक्षरक्ष: रांग लावली होती. पण ९०च्या दशकात गोविंदाला मिळालेले स्टारडम नंतरच्या काळात टिकू शकले नाही. गोविंदाने आपले स्टारडम का टिकून राहिले नाही याबद्दल वक्तव्य केले आहे.

स्टारडम हरवल्याचे कारण गोविंदाने एका मुलाखतीत दिले आहे. बॉलिवूडमध्ये असलेल्या कोणत्या ग्रुपचा भाग नसणे हे त्याच्या बॉलिवूड कारकीर्दीसाठी नुकसानकारक ठरल्याचे गोविंदाने सांगितले. गोविंदा जर कोणत्या मोठ्या घराण्यातून किंवा बॉलिवूडमध्ये असलेल्या कोणत्या ग्रुपमध्ये असता तर त्याला अजूनही अनेक चित्रपट मिळाले असते असे त्याने म्हटले आहे. “बॉलिवूड एक मोठ्या कुटूंबासारखे आहे. जर तुम्ही कुटूंबातल्या प्रत्येक सदस्यासोबत चांगले संबंध टिकून ठेवले तर तुम्हाला काम मिळते” असं गोविंदा म्हणाला होता.

पुढे तो म्हणाले की, “याशिवाय वाईट काळात अनेकांनी मला मदत करण्याऐवजी मला अजून संकटात टाकण्याचा प्रयत्न केला. यामुळे मी पुढे जाऊ शकलो नाही तर मी पाठीच राहिलो.”

डेव्हिड धवन यांच्या सोबत एकामागोमाग एक सुपर हिट कॉमेडी चित्रपट देऊन सुद्धा नंतरच्या काळात गोविंदा आणि डेव्हिड धवन यांच्यात वाद निर्माण झाले. त्यामुळे आता गोविंदाने डेव्हिड धवनसोबत कोणताही चित्रपट करण्याची इच्छा नसल्याचे सांगितले आहे.