गेल्या काही दिवसांमध्ये अनेक टेलिव्हजनवरील कलाकारांनी बॉलिवूडमध्ये चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला होता. यातच अभिनेता गुरमीत चौधरी यानेदेखील बॉलिवूडवर आरोप केले आहेत.

टीव्हीवरील कलाकारांना बॉलिवूडमध्ये काम देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचं गुरमीत म्हणाला आहे. एका मुलाखतीत गुरमीतने हा खुलासा केला आहे. गुरमीत म्हणाला, ” जेव्हा आम्ही सिनेमामध्ये काम मागतो तेव्हा वेगवेगळी कारणं दिली जातात. तुम्हाला रोज मालिकांमध्ये पाहिलं जातं. मग कुणी तुमच्यावर का पैसे लावावे. ” अशा प्रतिक्रिया येत असल्याचं त्याने सांगितलं. टीव्हीवरील अनेक कलाकारांना सिनेमात काम करण्याची इच्छा मात्र बॉलिवूडमध्ये त्यांना एण्ट्रीच दिली जात नाही असा खुलासा त्याने केला आहे.

याचसोबत गुरमीतने सुशांत सिंह राजपूतच्या बॉलिवूडमध्ये मिळालेल्या यशाचा उल्लेख केला. सुशांतनेदेखील मालिकेनंतर ब़ॉलिवूडमध्ये एण्ट्री केली, “त्याचा प्रवास पाहून मलाही सिनेमात काम करण्याची इच्छा झाली. त्यामुळेच मी ठरवलं कि, मी सिनेमात फक्त चांगलं कामच करणार नाही तर प्रेक्षकांची मनं देखील जिंकेन.”असं तो म्हणाला

गुरमीत चौधरीचा नुकताच झी5 वर ‘द वाइफ’ हा ह़ॉरर सिनेमा रिलीज झाला आहे. ‘खामोशीया’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचसोबत ‘पलटन’ या सिनेमातही तो झळकला आहे. ‘गीत’, ‘पुर्नविवाह’ यासारख्या मालिकांमधून गुरमीतने प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. तर 2008 सालात आलेल्या  ‘रामायण’ मालिकेत त्याने रामाची भूमिका साकारत प्रेक्षकांची मोठी पसंती मिळवली होती.