कला दुःखातून जन्माला येते असं ऐकलंय, नाग्या तुझी कला जखमेतून येतेय. ती जखम भळभळत राहो आणि ती आमची होवो, या शब्दांत मराठी चित्रपटसृष्टीतला सुप्रसिद्ध अभिनेता जितेंद्र जोशी याने ‘सैराट’ चित्रपटाचा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचे कौतुक केले आहे.

‘सैराट’ चित्रपटपाहून भारावलेल्या जितेंद्रने आपल्या फेसबुक पेजवर नागराजच्या कामगिरीवर एक छोटेखानी लेख पोस्ट केला आहे. यामध्ये जितेंद्रने नागराजच्या दिग्दर्शन कौशल्याचे तसेच एक संवेदनशील दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीला मिळाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.

नागराज मंजूळे नावाचा लेखक आणि त्याने पाहिलेलं/जगलेलं आयुष्य या चित्रपट पाहिल्यानंतर डोळ्यासमोर तरंगत राहतं. आपल्याकडे अनेक ग्रामीण चित्रपट झालेत आणि होताहेत परंतु नागराजने त्याच्या गावच्या , माणसांच्या मातीची नेत्रादिपक कथा आपली सर्वाची केली आणि केवळ म्हणूनच त्याला व्यावसायिक यश मिळालं आणि त्याचा मला सर्वाधिक आनंद वाटतोय, असे जितेंद्रने नागराजचे तोंडभरुन कौतुक केले आहे. तसेच नागराज तू यशाला जुमानू नकोस आणि काम करत रहा, असेही लेखाच्या शेवटी जितेंद्रने नमूद केले आहे.