सुपरस्टार रजनीकांत यांनी चंद्रा हसन यांच्या शोकसभेमध्ये त्यांचे मन मोकळे केले. चंद्रा हसन (८२) हे अभिनेता कमल हसनचे ज्येष्ठ बंधू होते. कमल हसन यांच्या जीवनामध्ये त्यांनी फार महत्त्वाची भूमिका बजावली होती. यावेळी रजनीकांत यांनी चंद्रा हसन यांच्या आठवणींना उजाळा दिला. या शोकसभेला रजनीकांतव्यतिरिक्त कॉलिवूडमधील इतरही कलाकारांनी हजेरी लावली होती. या कलाकारांमध्ये सत्यराज, नसर, विशाल, के. एस. रवीकुमार आणि इलियाराजा यांचा समावेश होता. दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चंद्रा हसन हे बरंच प्रसिद्ध नाव आहे.

‘कमल हसन यांनी आजपर्यंत जी काही कमाई केली आहे त्याचं श्रेय त्यांच्या मोठ्या भावाला म्हणजेच चंद्रा हसन यांना गेलं पाहिजे. सध्याच्या घडीचे कलाकारही पुष्कळ कमाई करतात. पण, कमल हसन यांना आजवर त्याचा काहीच फरक पडला नाही. चंद्रांशिवाय कमल हसन हे सर्व कसं हाताळणार हाच विचार करुन मला चिंता वाटत आहे.’ असे रजनीकांत म्हणाले. रजनीकांत यांच्या या वक्तव्यातून लक्षात येत आहे की, चंद्रा हसन हे कमल यांचे सर्व व्यवहार पाहायचे.

रजनीकांत यांनी यावेळी बोलताना कमल आणि चंद्रा हसन यांच्यामध्ये असणाऱ्या नात्याकडे सर्वांचे लक्ष वेधले.
यावेळी रजनीकांत म्हणाले, ‘फक्त चंद्रा आणि चारु हे दोन भाऊच कमल यांचा राग सहन करु शकतात. मी आतापर्यंत भेटलेल्या व्यक्तींपैकी कमल हसन हे सर्वांत रागीष्ट व्यक्ती आहेत.’ या शोकसभेमध्ये रजनीकांत यांनी कमल हसन यांचे सांत्वन केले. यावेळी रजनीकांत यांच्या बोलण्यानंतर आपल्या भावाविषयीचे मनोगत व्यक्त करताना कमल हसन यांच्या भावनांचा बांध फुटला. चंद्रा हसन यांच्या स्मृतींना उजाळा देत असतानाच कमल हसन यांनी रजनीकांतचे त्यांच्या जीवनात असलेले स्थान आणि महत्त्व याविषयीसुद्धा भाष्य केले.

रजनीकांत आणि कमल हसन हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील दोन प्रसिद्ध चेहरे आहेत. चाहत्यांचे प्रेम, सहकलाकारांकडून मिळणारा आदर आणि चित्रपटसृष्टीमध्ये असणारे मानाचे स्थान पाहता या कलाकारांची मैत्री म्हणजे अनेकांसाठीच आदर्श ठरते आहे.