अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थविरोधी पथकाने अटक केली. चौकशीदरम्यान रियाने अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या अनेक मंडळींची नावं घेतली. त्यानंतर एनसीबीने विविध ठिकाणी छापे टाकून नामांकित ड्रग्स पेडलर्सला ताब्यात घेतलं. ही कारवाई सुरु असतानाच क्राईम ब्रांचने बॉलिवूड अभिनेता किशोर शेट्टीला अटक केली आहे. स्वत:जवळ ड्रग्स बाळगल्या प्रकरणी त्याला क्राईम ब्रांचने ताब्यात घेतलं आहे. दरम्यान किशोरचा रिचा चक्रवर्तीच्या केसशी काही संबंध आहे का? याची चौकशी देखील केली जाणार आहे.

किशोर शेट्टी एक प्रसिद्ध डान्सर आहे. ‘डान्स इंडिया डान्स’ या रिअॅलिटी शोमुळे त्याला प्रसिद्धी मिळाली होती. दिग्दर्शक रेमो डिसुझाच्या ‘एबीसीडी’ या चित्रपटात देखील तो झळकला होता. अंमली पदार्थविरोधी पथकाने विविध ठिकाणी छापे टाकून देशातील ड्रग्स विकणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली आहे. या कारवाई दरम्यान बॉलिवूडमधील अनेक कलाकारांची नावं समोर आली आहेत. यापैकी एक नाव किशोर शेट्टी हे होते. क्राईम ब्रांचला त्याच्या जवळ ड्रग्स सापडले. त्यामुळे त्याला अटक करण्यात आली आहे.

रिया, शोविकचा जामीन अर्ज फेटाळला

अभिनेता सुशांत सिंह राजपूतला मृत्युपूर्वी अंमली पदार्थ उपलब्ध केल्याच्या आरोपाप्रकरणी अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शोविक या दोघांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. विशेष न्यायालयाने रिया आणि शोविकसह अब्दुल बसित, झैद विलात्रा, दीपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाने अटकेनंतर दुसऱ्यांदा जामिनासाठी अर्ज केला होता. अटक झाल्यानंतर न्यायालयाने तिला पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्या वेळी तिने जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळला.