करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी जाहीर करण्यात आलेला लॉकडाउन अजूनही कायम असल्याने टीव्ही आणि बॉलिवूड कलाकारांनाही खूप मोठा आर्थिक फटका बसला असून अनेकांचे हाल होत आहेत. काही अभिनेत्यांनी आत्महत्या केल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. तर काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली परिस्थिती सांगत गा-हाणं मांडत आहेत. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये अभिनेता राजेश करीर यांनी आपल्याला जगण्यासाठी फक्त ३०० रुपयांची मदत मागितली होती. हा व्हिडीओ समोर येताच लोकांनी त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली आहे की, राजेश करीर यांनी अजून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आता मदत थांबवा असं आवाहन केलं आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही भावूक व्हाल.

राजेश करीर यांनी आपल्या नव्या व्हिडीओत आता पैशांची मदत करणं थांबवा असं आवाहन केलं आहे. राजेश करीर यांनी आर्थिक परिस्थिती बिघडल्याने त्रस्त होऊन आपला बँक खात्याचा क्रमांक देत मदत मागितली होती. यानंतर त्यांना मदतीचा पूरच आला.

राजेश करीर आपल्या व्हिडीओत सांगत आहेत की, “मी फेसबुकवर पोस्ट करत वाईट परिस्थितीबद्दल सांगितलं होतं. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, रविवारपासून ते गुरुवारपर्यंत देवाने तुम्हा सर्वांच्या रुपात दोन्ही हाताने मला मदत केली आहे. जणू काही सर्व भारतीयांनी माझा हात पकडला असून, खांद्यावर हात ठेवला आहे असं वाटत होतं. माझ्या कुटुंबाला चिंता करु नका, आम्ही सोबत आहोत असं सांगत आहेत. मी आज संतुष्ट असून परिस्थिती आता वाईट राहिलेली नाही”.

राजेश करीर गेल्या १५ वर्षांपासून मुंबईत आपल्या कुटुंबासोबत राहत आहेत. ते मुळचे पंजाबचे आहेत. अभिनेत्री शिवांगी जोशीच्या मालिकेत त्यांनी वडिलांची भूमिका निभावली होती.