अभिनेता सुशांतसिंग राजपूत खूप नैराश्यात होता, अशी माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.  त्याच्या आत्महत्येचे नेमके  कारण शोधण्यासाठी पोलीस त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रमुख घटना-घडामोडी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

तपासात आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार सुशांतसिंग याचे नैराश्य समुपदेशनाच्या पलिकडे गेले होते आणि त्याला वैद्यकीय उपचारांची गरज होती, अशी माहिती तपासाशी संबंधित एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकसत्ता’ला दिली.

सुशांतचा मृत्यू गळफास घेतल्यानंतर श्वास रोखला गेल्याने झाल्याचे शवचिकित्सा अहवालात नमूद केले असल्याचे पोलीस उपायुक्त अभिषेख त्रिमुखे यांनी स्पष्ट केले. याप्रकरणी आतापर्यंत सहाजणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. तपासातील प्रगती, आवश्यकतेनुसार चित्रपटसृष्टीशी संबंधित व्यक्तींकडे चौकशी केली जाईल. अद्याप सुशांतच्या आत्महत्येमागील नेमके  कारण स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वांद्रे येथील निवासस्थानी सुशांतसोबत राहणाऱ्या चार व्यक्ती, मुंबईत वास्तव्यास असलेली त्याची बहीण आणि चावी बनवणारा कारागीर यांचे जबाब आतापर्यंत नोंदवण्यात आवे आहेत. सुशांतने अभिनेता मित्र महेश शेट्टी याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. आत्महत्येपूर्वी त्याने केलेला हा अखेरचा फोन असल्याने शेट्टीचीही पोलिसांनी विचारपूस केली. सुशांतने संपर्क साधला तेव्हा मी झोपलो होतो. रविवारी दुपारी मी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा सुशांतने फोन घेतला नाही, असे शेट्टीने पोलिसांना सांगितल्याचे समजते.

मृत्यूबाबत कोणावर संशय? सुशांतचे नैराश्य याबाबत कुटुंबीयांकडे विचारणा करण्यात आली. मंगळवारी या कुटुंबाचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे. सोमवारी न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या पथकाने सुशांतच्या घरातून काही नमुने घेतल्याचे पोलिसांनी सांगितले. आत्महत्येनंतर सुशांतच्या मृतदेहाची छायाचित्रे समाजमाध्यमांवरून प्रसारित झाल्याबद्दल पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी वांद्रे पोलिसांना जाब विचारला आहे.

सहकलाकारांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी साडेचार वाजता विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गर्दीवर असलेले निर्बंध लक्षात घेत मोजके  नातेवाईक आणि सहकलाकारांच्या उपस्थितीत सुशांतला अखेरचा निरोप देण्यात आला.

बॉलिवूडचा यशस्वी अभिनेता असा अल्पावधीतच लौकिक मिळवलेल्या सुशांतसिंह राजपूत याने रविवारी आत्महत्या केली. सुशांतचे वडील, काका असे काही मोजके  नातेवाईक सोमवारी पाटण्याहून वांद्रे येथील त्याच्या निवासस्थानी दाखल झाले. सुशांतच्या मुंबईतील बहिणी, त्यांचा परिवार आणि त्याच्याबरोबर काम केलेले  मालिके तील काही त्याचे मित्र कलाकारही त्याच्या निवासस्थानी उपस्थित होते. दुपारी साडेतीन-चारच्या सुमारास कू पर रुग्णालयातून सुशांतचे पार्थिव पार्ले येथील स्मशानभूमीत आणून अंतिम संस्कार करण्यात आले. करोना निर्बंधामुळे ज्या ज्या नावाजलेल्या निर्माता-दिग्दर्शक- कलाकार मंडळींबरोबर सुशांतने काम के ले होते, त्यांच्यापैकी फारसे कोणी स्मशानभूमीत उपस्थित नव्हते. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटातील सुशांतची नायिका अभिनेत्री श्रद्धा कपूर, अभिनेत्री क्रिती सनन, कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा (ज्यांच्या ‘दिल बेचारा’ या अप्रदर्शित चित्रपटाचा नायक सुशांत होता.) आणि त्याला चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पहिली संधी देणारा दिग्दर्शक अभिषेक कपूर, ज्येष्ठ पार्श्वगायक उदित नारायण अशी मोजकी मंडळी अंत्यसंस्कारास उपस्थित होती.

प्रेयसी रिया चक्रवर्तीची अखेरची भेट

गेले काही महिने सुशांतसिंह राजपूत आणि अभिनेत्री रिया चक्रवर्ती यांच्यातील प्रेमप्रकरण चर्चेत होते. मात्र गेल्या काही दिवसांत या दोघांमधील संबंध बिघडले आणि रिया आपल्या घरी परतली अशी चर्चा होती. सोमवारी सकाळी रिया आपल्या काही मित्रमैत्रिणींसह कूपर रुग्णालयात पोहोचली. तिने रुग्णालयातच सुशांतचे अखेरचे दर्शन घेतले