16 January 2021

News Flash

तारांगण घरात : स्वत:चा नव्याने शोध घेण्याचा हा काळ..

एखादी गोष्ट ओढूनताणून करण्यापेक्षा ती मनापासून करावीशी वाटली पाहिजे.

वैभव मांगले

चिंची चेटकीण नेमकी गेली कु ठे? या प्रश्नाचे उत्तर आता सापडले आहे. उत्तम अभिनयाबरोबरच शास्त्रीय संगीताचा अभ्यास, गाण्याची आवड आणि चित्रकारिता या तिन्ही गोष्टी वैभव मांगले यांनी मनापासून जपल्या आहेत. ‘गाण्याची आवड मला होतीच, चित्रकारितेकडे मी ओढला गेलो. चित्र काढण्यात माझा जीव रमत गेला. एखादी गोष्ट ओढूनताणून करण्यापेक्षा ती मनापासून करावीशी वाटली पाहिजे. तुमची आंतरिक ऊर्मी तिथे जास्त महत्त्वाची ठरते. ज्या गोष्टीत तुमचा जीव रमतो, ती गोष्ट तुमच्याकडून छान होते, असे माझे स्पष्ट मत आहे आणि त्या विचारानुसारच मी पुढे जातो,’ असे सांगतानाच आताही गावी दगडावरची चित्रकारिता सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या आकारांच्या दगडांवर विविधरंगी आविष्कार सुरू आहे. दगडावरची चित्रे काढत असतानाच या मी रंगवलेल्या वस्तू, चित्रे विक्रीस ठेवावीत आणि त्यातून मिळणारा पैसा रंगमंच कामगार जे सध्या काम नसल्याने अडचणीत आहेत, त्यांना आर्थिक मदत स्वरूपात द्यावा, असा विचार मनात आल्याचे वैभव यांनी सांगितले. सध्या हा विचार कृतीत आणण्याच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. त्यासाठी त्यांनी आपला ई मेल आयडीही दिला आहे. vaibhavmangale@gmail.com  या ई-मेल आयडीवर इच्छुक संपर्क  करू शकतात.

स्वत:चा नव्याने शोध घेत राहणे आणि त्या अर्थाने स्वत:त रमणे हा नेहमीच स्वान्त सुखाय या उद्देशाने नसतो. टाळेबंदीमुळे आजूबाजूला प्रत्येक जण सध्या स्वत:ची जागा निर्माण करण्यात, शोधण्यात दंग आहे. अशा वेळी दुसरे कोण काय करत आहेत, यापेक्षा आपण काय करत आहोत याचा विचार जास्त महत्त्वाचा असतो. कलाकार म्हणून या काळातही लोकांच्या सतत संपर्कात राहण्याचा, जाणूनबुजून नवीन काही शिकण्याचा प्रयत्न मी मुद्दामहून टाळतो आहे. उलट, या काळात मी मुलांबरोबर गावी राहतो आहे. ती या वातावरणात किती रमली आहेत हे अनुभवणे मला जास्त आनंददायी वाटते आहे, असे अभिनेता वैभव मांगले यांनी सांगितले.

टाळेबंदीची ही इतकी मोठी सुट्टी आपण पहिल्यांदाच मुलांबरोबर कोकणात गावी घालवतो आहोत, असे त्यांनी सांगितले. एरव्ही एसी हवा म्हणून रडणारी, गार पाण्याचा हट्ट धरणारी मुले कोकणात तापमान जास्त असतानाही कोणतीही तक्रार न करता आनंदात घालवत आहेत, याचेच नवल वाटत असल्याचे त्यांनी सांगितले. नदीत डुंबणे, गुरांबरोबर खेळणे, जंगलात फिरणे, आंबा-काजू-करवंदांचा रानमेवा हा सगळा आनंद त्यांना पहिल्यांदाच अनुभवायला मिळायला आहे. त्यामुळे पिझ्झा वगैरेची आठवण दूरच राहिली. रोजची भाजी-भाकरी, भात-आमटी असे साधे जेवणही त्यांना गोड वाटते आहे. त्यांचा हा आनंद पाहिल्यावर खरेच आपण त्यांच्यापासून काय हिरावून घेतो आहोत, याचा पुन्हा विचार करावासा वाटतो. खरे सुख कोणते, याचा शोध घ्यायला हवा. टाळेबंदीच्या काळाने ही खूप मोठी गोष्ट शिकवली असल्याचे त्यांनी सांगितले.

संकलन – रेश्मा राईकवार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 14, 2020 2:24 am

Web Title: actor vaibhav mangle activities in lockdown zws 70
Next Stories
1 तारांगण घरात : कथाकथन आणि मंडाला चित्रकला..
2 करोनाष्टक : व्यायामाची सवय
3 तारांगण घरात : लाइव्ह सत्रांचे अर्धशतक!
Just Now!
X