* अभिनेते विलास गुर्जर यांचा आगळा विक्रम
* ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकात गेली पन्नास वर्षे ‘पठाण’च्या भूमिकेत
रंगभूमीवर एखाद्या नाटकाचे पाचशे, हजार किंवा त्यापेक्षा अधिक प्रयोग होणे, एकाच दिवशी एकाच नाटकाचे सलग तीन किंवा चार प्रयोग सादर होणे असे विक्रम घडत असतात. पण एक अभिनेता, एक नाटक आणि एक भूमिका असा योग जुळून येणे तसे दुरापास्तच. पण ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकाच्या माध्यमातून हा योग जुळून आला आहे. ज्येष्ठ अभिनेते विलास गुर्जर हे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात गेली पन्नास वर्षे ‘पठाण’ ही भूमिका करत आहेत.
पहिल्यांदा हे नाटक बाळ कोल्हटकर यांच्या संस्थेतर्फे रंगमंचावर सादर झाले. सुरुवातीच्या काही प्रयोगात यातील ‘रंगराव’ही भूमिका शंतनुकुमार राणे हे अभिनेते करत असत. ‘पठाण’ची भूमिका अन्य कलाकार करत होते. राणे यांच्या निधनानंतर बाळ कोल्हटकर यांनी विलास गुर्जर यांना ‘रंगराव’च्या भूमिकेसाठी विचारणा केली. तसेच पुढे नाटकाच्या दौऱ्यानिमित्ताने तीन वेगवेगळ्या भूमिकांसाठी तीन माणसे नेण्यापेक्षा एकाच अभिनेत्याला या तीन भूमिका द्याव्यात, ते सोयीचेही होईल. या उद्देशाने ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ नाटकातील ‘रंगराव’, ‘पोलीस अधिकारी’ आणि ‘पठाण’ या तीनही भूमिका विलास गुर्जर करायला लागले. बाळ कोल्हटकर यांनी स्वत: गुर्जर यांच्याकडून त्या भूमिका बसवून घेतल्या. १९६६ पासून ते आजतागायत विलास गुर्जर हे ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकात ‘पठाण’ ही भूमिका करत आहेत.
या बाबत ‘रविवार वृत्तान्त’शी बोलताना गुर्जर म्हणाले, बाळ कोल्हटकर यांच्या पश्चात १९८४ मध्ये हे नाटक मी आणि भालचंद्र नाईक यांनी नव्याने रंगमंचावर आणले. तेव्हाही मी नाटकात ‘पठाण’ हीच भूमिका करत होतो. आता ‘किशोर थिएटर्स’तर्फे किशोर सावंत यांनी हे नाटक पुन्हा एकदा नव्याने रंगमंचावर आणले आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अभिनेते विजय गोखले यांनी केले असून नाटकातही मीच ‘पठाण’ ही भूूमिका करतो आहे. नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग येत्या २१ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता शिवाजी मंदिर, दादर येथे होणार असून अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष गंगाराम गवाणकर हे या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. अभिनेत्री आणि ‘लिटिल थिएटर’च्या सुधा करमरकर यांच्या जवळपास सगळ्याच बालनाटय़ात गुर्जर यांनी लहान-मोठय़ा भूूमिका केल्या आहेत. या बालनाटय़ांचे एक हजार प्रयोग त्यांच्या नावावर जमा आहेत. बाळ कोल्हटकर यांच्या नाटय़संस्थेतर्फे सादर झालेल्या ‘देव दिनाघरी धावला’, ‘लहानपण देगा देवा’, ‘उघडले स्वर्गाचे दार’, ‘देणाऱ्याचे हात हजार’ आदी नाटकातूनही विविध भूमिका केल्या आहेत. ‘नटसम्राट’ नाटकात दत्ता भट, यशवंत दत्त, राजा गोसावी, मधुसूदन कोल्हटकर आदींबरोबर काम केले आहे. या नाटकात त्यांनी जी जी भूमिका मिळेल ती समर्थपणे केली आहे. प्रभाकर पणशीकर यांच्यासमवेत ‘तो मी नव्हेच’ या नाटकातही त्यांनी लहान-मोठय़ा भूमिका साकार केल्या आहेत. पुरुषोत्तम दारव्हेकर, मो. ग. रांगणेकर, बाळ कोल्हटकर, प्रभाकर पणशीकर आदींचे मोलाचे मार्गदर्शन त्यांना आजवरच्या अभिनय प्रवासात मिळाले आहे. बॅंकेतील नोकरी सांभाळून गुर्जर यांनी नाटकाचे प्रयोग, दौरे केले. आज वयाच्या ७७ व्या वर्षांतही त्यांचे नाटकाचे प्रयोग, दौरे आणि इतर सामाजिक काम सुरू आहे.