‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वाची आणि यंदाच्या स्पर्धकांची घोषणा नुकतीच करण्यात आली. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही या शोमध्ये कोण सहभागी होत आहे, याची चर्चा होण्यापेक्षा कोणाला मालिकेमुळे हा शो सोडावा लागला किंवा कोणी या शोसाठी मालिका सोडली याची उत्सुकता सर्वाना जास्त आहे. यंदाही मोहित मलिकला या शोसाठी त्याच्या मालिकेवर पाणी सोडावे लागले आहे. कलाकारांसाठी आणि वाहिन्यांसाठी ही बाब नक्कीच नवीन नाही. ‘झलक दिखला जा’, ‘नच बलिये’, ‘बिग बॉस’सारख्या शोसाठी हातातील मालिकांवर पाणी सोडण्यास कलाकार एका पायावर तयार असतात. त्यातही काही जणांनी एकाच वेळी दोन्ही शो सांभाळण्याची तयारी दाखवली तरी वाहिन्यांच्या आपापसांतल्या स्पर्धामुळे त्या कलाकारांवर आडकाठी आणली जाते. त्यामुळे मालिका आणि रिअॅलिटी शो यातील एकाची निवड करण्याची वेळ या कलाकारांवर येऊन ठेपते.
‘झलक..’मध्ये भाग घेण्यासाठी जिया मलिकने ‘साथिया’ मालिकेतील गोपीच्या भूमिकेवर पाणी सोडले, हा खरे तर प्रेक्षकांसाठी मोठा धक्का होता. कारण तोपर्यंत गोपीची व्यक्तिरेखा टीव्हीवर सर्वात लोकप्रिय होती. सुरुवातीला निर्मात्यांनी तिला शो करण्याची परवानगी दिली होती. पण ही मालिका ‘स्टार प्लस’वर होती, तर शो ‘कलर्स’ या स्पर्धक वाहिनीवर. त्यामुळे दोन बडय़ा वाहिन्यांमध्ये असणाऱ्या स्पर्धेमुळे जियाची इच्छा असूनही एकाच वेळी दोन्ही शो करण्याची तिला परवानगी दिली गेली नाही. सलग दोन वर्षे गोपीची व्यक्तिरेखा करून थकलेल्या जियाने नवीन काही तरी करण्याच्या संधीला आपलेसे करत मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. मोहित मलिकच्या प्रकरणात ‘डोली अरमानों की’ ही मालिका काही वर्षांनी पुढे जाणार होती. अशा वेळी त्याला मालिकेमध्ये वडील आणि मुलगा अशी दुहेरी भूमिका करण्याची संधी मिळणार होती. त्याबद्दल घोषणाही झाली होती. पण ‘झलक..’साठी त्याने मालिकेला रामराम ठोकला. ‘नच बलिये’च्या यंदाच्या पर्वामध्ये शक्ती अरोरानेही भाग घेतला होता. सध्या त्याचा ‘कलर्स’वर ‘मेरी आशिकी तुमसेही’ हा शो सुरू आहे. एकता कपूरच्या ‘बालाजी टेलिफिल्म्स’नेच दोन्ही शोची निर्मिती केली असल्यामुळे शक्तीला निर्मात्यांकडून कोणताही अडसर आला नाही. पण वाहिनीच्या आडमुठय़ा धोरणामुळे त्याला मालिकेसाठी शो मध्येच सोडावा लागला. त्याच वेळी मृणाल ठाकूरही एकाच वेळी ‘नच बलिये’ आणि ‘कुमकुमभाग्य’ ही ‘झी टीव्ही’वरची मालिका करत होती. पण शोसाठी तिला मालिकेतून काही काळासाठी रजा देण्यात आली होती. असा समजूतदारपणा प्रत्येक वेळी वाहिन्यांकडून दाखविला जात नाही. दिव्यांका त्रिपाठीलाही वाहिनीसोबतच्या तिच्या करारामुळे यंदा ‘झलक..’मध्ये भाग घेता आला नाही. पण आता लवकरच या मालिकेतही कथानक काही वर्षे पुढे ढकलण्यात येत असून त्यातून दिव्यांकाची गच्छंती होणार आहे. अशा वेळी वाहिन्यांमधील स्पर्धेमध्ये दिव्यांकाच्या हातातील संधी निसटली. ‘जमाई राजा’ मालिकेतील जमाई रवी दुबेलाही यंदा ‘झलक..’मध्ये भाग न घेता येण्याचे मुख्य कारण हेच आहे. या रिअॅलिटी शोजमधून कलाकारांना मिळणारे मानधन हे मालिकांपेक्षा कैक पटीने जास्त असते. तसेच त्यांना बॉलीवूडची दारेही खुली होण्याच्या संधी या शोमधून मिळतात. त्यामुळे कलाकार हे शोज करण्यास उत्सुक असतात. ‘नच बलिये’च्या मागच्या पर्वामध्ये नीलू वाघेलाने तिची मालिका ‘दिया और बाती हम’ आणि शो दोन्ही गोष्टी लीलया सांभाळल्या होत्या. मागच्या वर्षी ‘झलक..’चा विजेता आशीष शर्मानेही शो करत असताना त्याच्या ‘रंगरसिया’ मालिकेतील कामही नीट बजावले होते. अर्थात, या दोन्ही गोष्टी सांभाळताना त्याला त्रास झाल्याचे त्याने नंतर मान्य केले. पण त्यामुळे शो किंवा मालिका सोडण्याची कलाकारांची तयारी नसते. या दोघांना हे करणे शक्य झाले, कारण त्यांच्या मालिका आणि शो एकाच वाहिनीवर होते. त्यामुळे वाहिनीने त्यांच्या सोयीनुसार चित्रीकरणात बदल करून देण्याची तयारी दाखवली. मालिकेमध्ये नायिकेची किंवा नायकाची दाखवली जाणारी आदर्शवादी प्रतिमा अशा प्रकारच्या शोमुळे डळमळीत होते, असे वाहिन्यांकडून सांगितले जाते. त्याच वेळी या कलाकारांच्या मालिकेतील लोकप्रियतेचा फायदा शोच्या प्रसिद्धीसाठी केला जातो, हे वाहिन्यांना खटकते. त्यामुळे आपल्या कलाकारांना सोडण्याची तयारी वाहिन्या दाखवत नाहीत. यात कलाकारांची मात्र रस्सीखेच होते. पण सध्याचे वाहिन्यांमधील स्पर्धेचे वातावरण पाहता हे चित्र येत्या काळात कायम राहणार आहे. त्यामुळे ‘मालिका की रिअॅलिटी शो’ हे कलाकारांच्या पाठी लागलेले कोडे सहज सुटणारे नाही.
संग्रहित लेख, दिनांक 5th Jul 2015 रोजी प्रकाशित
वाहिन्यांची स्पर्धा आणि कलाकारांची रस्सीखेच
‘झलक दिखला जा’च्या नव्या पर्वाची आणि यंदाच्या स्पर्धकांची घोषणा नुकतीच करण्यात आली. पण दरवर्षीप्रमाणे यंदाही या शोमध्ये कोण सहभागी होत आहे
First published on: 05-07-2015 at 01:11 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Actors face problems with tv serials