करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने देशात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवलेलं आहे. या काळात नागरिकांनी जास्तीत जास्त वेळ घरात राहून सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचं आवाहन सरकार करत आहे. काही दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या तबलिघींच्या कार्यक्रमामुळे देशातील अनेक शहरांमध्ये करोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. या कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात केंद्र सरकार कारवाई करण्याच्या तयारीत आहे. भारताची महिला कुस्तीपटू बबिता फोगटने आपल्या ट्विटर अकाऊंटवर तबलिघींच्या कार्यक्रमावर टिका करणारं ट्विट केलं होतं.

आणखी वाचा- “तुमच्या धमक्यांना घाबरुन घरी बसायला मी झायरा वसीम नाही”, बबिता फोगटचं सणसणीत उत्तर

या ट्विट नंतर सोशल मीडियावर बबिता फोगटवर नेटकऱ्यांनी टिकेची झोड उठवली होती. बबिता द्वेष पसरवत असल्याचा आरोपही काही जणांनी केला. यानंतर बबिताने व्हिडीओ करुन आपल्याला काही जणांच्या धमक्या येत असल्याचंही सांगितलं. कितीही धमक्या आल्या तरीही आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं बबिताने स्पष्ट केलं. अभिनेत्री कंगना रणौतनेही बबिता फोगटला आपला पाठींबा दर्शवला आहे.

आणखी वाचा- ‘हे प्रश्नदेखील नक्की विचार’; स्वरा भास्करने बबिता फोगटला दिली प्रश्नांची यादी

सध्याच्या काळात राष्ट्रवादाचा आवाज उठवणाऱ्या लोकांना सोशल मीडियावर अशाच पद्धतीने त्रास होतो आहे. बबिता फोगटला केंद्र सरकारने सुरक्षा पुरवावी अशी मागणी कंगनाने केली आहे. दरम्यान, आपली बहिण रंगोलीवर होत असलेल्या टीकेनंतर कंगनाने सोशल मीडियावर आपल्या बहिणीचं समर्थन केलं आहे.