कलाविश्वामध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांना करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल करावा लागला होता. या संघर्षाच्या काळात त्यांना बरे-वाईट अनुभवदेखील आले. इतकंच नाही तर अनेक अभिनेत्रींना लैंगिक अत्याचाराला बळीदेखील पडावं लागलं. मात्र गेल्या वर्षभरात अनेक महिलांनी कामाच्या ठिकाणी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला MeToo मोहिमेअंतर्गंत वाचा फोडली. अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर गैरवर्तनाचे आरोप केल्यानंतर या मोहिमेने जोर धरला. MeToo चं वादळ आता शमलं आहे. मात्र पुन्हा एकदा एका टिव्ही अभिनेत्रीने तिचा कास्टिंग काऊचचा अनुभव शेअर केला आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री मल्हार राठोडने अलिकडे एका मुलाखतीत कास्टिंग काऊचा भयाण अनुभव शेअर केला. एका ६५ वर्षीय दिग्दर्शकाने तिला कपडे काढायला सांगितले होते.
“त्यावेळी मी कलाविश्वात नवीन होते आणि काम मिळावं यासाठी माझे प्रयत्न सुरु होते. त्यावेळी एका दिग्दर्शकाने मला काम देण्याच्या निमित्ताने बोलावलं होतं. मी तेथे गेल्यानंतर तुझ्यासाठी एक चांगली भूमिका आहे, परंतु त्यापूर्वी तू तुझे कपडे काढ, असं दिग्दर्शकाने सांगितलं. त्याचं हे वाक्य ऐकल्यानंतर मी प्रचंड घाबरले आणि तेथून पळ काढला”, असं मल्हारने सांगितलं.
दरम्यान, कलाविश्वात बऱ्याच महिलांना असे अनुभव आल्यामुळे त्यांनी कलाविश्वाला रामराम केला होता. मात्र काही अभिनेत्री अशाही आहेत ज्या या साऱ्याला निडरपणे सामोऱ्या गेल्या आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवला. मल्हारने आतापर्यंत अनेक मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम केलं आहे. ‘तेरे लिए ब्रो’, ‘सनसिल्क रियल एफएम’ आणि ‘होस्टेजेस’ या सिरीज तिने केल्या आहेत.