बुलढाणा येथे अभिनेत्री नेहा पेंडसेला एका कार्यक्रमात धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. चिखली येथे नेहा पेंडसे दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी उपस्थित होती. ही दहीहंडी भाजपातर्फे आयोजित करण्यात आली होती आणि याच कार्यक्रमात नेहाला चाहत्यांचा त्रास सहन करावा लागला. दहीहंडीच्या ठिकाणी आपण उपस्थित असताना कार्यकर्ते व्यासपीठावर येऊन एकच गर्दी करत होते अशी तक्रार नेहाने केला आहे. या कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याची विनंती करुनही त्यांनी माझे ऐकले नाही असा आरोप नेहाने केला आहे. जवळ येऊन सेल्फी काढू नका, लांबून हवे तेवढे फोटो घ्या अशी विनंतीही आपण केली मात्र त्याला कोणी जुमानतच नव्हते असेही नेहा पुढे म्हणाली.

या प्रकारामुळे नेहा हिने आयोजकांना खडे बोल सुनावून ती रागारागात कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. यावेळी भाजपच्या महिला व बालकल्याण सभापती श्वेता महाले यांनी नेहा पेंडसे हिची माफी मागितली मात्र तरीही आपल्याला त्रास झाल्याचे सांगत ती रागारागात कार्यक्रम स्थळावरून निघून गेली. नेहा व्यासपीठावर चढत असताना भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी तिला धक्काबुक्की केली. दहीहंडीच्या निमित्ताने गर्दी खेचून आणण्यासाठी राज्यात कायमच बॉलिवूड आणि मराठी अभिनेते आणि अभिनेत्रींना आमंत्रण देण्यात येते. तेही प्रसिद्धी आणि पैसा यासाठी ही आमंत्रणे स्वीकारतात.

‘मुलीने विरोध केला तरीही तिला पळवून आणून तुम्हाला देणार’, या वक्तव्यावरुन राम कदम यांच्यावर टीका होत आहे. त्यातच भाजपाच्या कार्यक्रमात घडलेला हा प्रकार नक्कीच योग्य नाही. महिलांसंदर्भात बेताल वक्तव्य करणारे भाजप आमदार राम कदम यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे. कदम यांना सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येत आहे.