एकाच कलाकाराने एकाच नाटकात अनेक भूमिका करण्याचा प्रसंग मराठी रंगभूमीच्या इतिहासात अनेकदा आला आहे. मात्र एखाद्या स्त्री पात्राला तीन वेगवेगळ्या नाटकांमधील भूमिका एकाच नाटकात साकारण्याची संधी क्वचितच मिळाली आहे. ‘मी सिंधुताई सपकाळ’ या चित्रपटात तरूण सिंधुताईंची भूमिका करणाऱ्या तेजस्विनी पंडित हिच्या वाटय़ाला हे भाग्य ‘नांदी’ या नव्या नाटकाच्या निमित्ताने आले आहे. हृषिकेश जोशी लिखित-दिग्दर्शित या नाटकात तेजस्विनी ‘कीचकवध’मधील सैरंध्री, ‘सखाराम बाईंडर’मधील चंपा व ‘बुद्धिबळ व झब्बू’मधील नयनतारा अशा तीन ताकदीच्या भूमिका साकारत आहे.  एखाद्या नटीला एकाच नाटकात तीन भूमिका साकारायला मिळणे हे मोठे आव्हान आहे. मला भाषेच्या बाबतीत सैरंध्री ही व्यक्तिरेखा करणे जड आणि आव्हानात्मक ठरले. कृ.प्र. खाडिलकर यांनी लिहिलेली पल्लेदार वाक्ये, त्यांच्या भाषेचा लहेजा पेलणे कोणत्याही कलावंतांसाठी आव्हानच असते. मात्र एकदा भाषा समजून घेतली की पुढील काम आपोआप सोपे होते, असे तेजस्विनी पंडितने सांगितले. ‘बाईंडर’मधील चंपा किंवा ‘बुद्धिबळ व झब्बू’मधील नयनतारा या दोन भूमिका मात्र ‘सैरंध्री’च्या तुलनेत बऱ्यापैकी सोप्या होत्या असेही तिने स्पष्ट केले. या तिन्ही भूमिकांमध्ये एक समान धागा आहे. या तिघीही कायमच बंडखोर दाखविल्या आहेत. या तिन्ही व्यक्तिरेखांमधील अंश माझ्याही स्वभावात आहे, असे तेजस्विनीने सांगितले. यापुढेही नेहमीच अशाच आव्हानात्मक भूमिका स्वीकारण्याकडे माझा कल राहिला अशी खात्री तिने दिली.