News Flash

लोककला, लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा ‘एकदम कडक’ कार्यक्रम

अनेकविध कलांचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे.

विविध कला आणि संस्कृतींनी नटलेला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीचे मानाचे पान म्हणजे महाराष्ट्राच्या लोककला. मनोरंजनाच्या भाऊगर्दीत महाराष्ट्राच्या या लोककला आज लोप पावताना दिसत आहेत आणि पिढ्यान् पिढ्या या कला जोपासणारे लोककलावंतही आज हरवत चालले आहेत. लोककलांच्या या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनीने कंबर कसली असून लवकरच ‘एकदम कडक’ हा नवा कोरा शो घेऊन येत आहे. कलेला किंमत आणि कलावंताला हिम्मत देणारा हक्काचा मंच असेल ‘एकदम कडक’. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोककलेची पिढीजात परंपरा यशस्वीरीत्या सांभाळणारा आजचा आघाडीचा प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे करणार आहे. २८ जानेवारीपासून सोमवार ते बुधवारी रात्री साडे नऊ वाजता हा कार्यक्रम प्रसारित होईल.

लोकपरंपरेतून रूढ झालेल्या रोजच्या दैनंदिन व्यवहाराचे कलाविष्कार म्हणजेच लोककला. ज्यात दळणकांडण, सडा सारवण, जागरण- गोंधळ यांपासून ते अनेकविध देवदेवतांच्या उपासना, सण – उत्सव यातून आनंद शोधण्याचा आणि तो व्यक्त करताना लोकगीतांची, लोककलांची निर्मिती होत गेली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत या कलाविष्कारांनीच आपली एक भरजरी किनार जोडली. मग त्यात संतांचे अभंग असतील, बहिणाबाईंच्या जात्यावरच्या ओव्या असतील, खान्देशातील अहिराणी काव्य असेल, कोकणातील खेळे, दशावतार असतील, विदर्भातील झाडीपट्टी असेल अशा अनेकविध कलांचे दर्शन या कार्यक्रमात घडणार आहे. त्यात टिपरीचा ठेका, वाद्यांमधून बाद होत चाललेला कोका, केकावली, कळसूत्री, महाराष्ट्राची लावण्यवती लावणी असेल.

या कार्यक्रमातून समाजाच्या भावभावना, आशा आकांक्षा, विविध वृत्ती- प्रवृत्ती, रूढी परंपरा यांचा मागोवा घेतला जाणार असून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अस्सल कलावंतांना इथे व्यासपीठ मिळणार आहे. यात सामूहिक जीवनातले बारकावे, गावगाड्यातील वहिवाटी, आणि अनेक परंपरांमागची कथा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करतील. तर त्यांच्या जोडीला असतील, प्रसिद्ध विनोदवीर नंदकिशोर चौघुले, दिगंबर नाईक, भूषण कडू, तृप्ती खामकर आणि ज्यांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्रं, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करणार आहे. या कार्यक्रमाची निर्मिती पर्पल पॅच करत असून लेखन आणि दिग्दर्शन आशिष पाथरे करणार आहेत.

लोकसंस्कृतीचे, लोकस्वभावाचे दर्शन घडवणारा महाराष्ट्राचा हा दैदीप्यमान सांस्कृतिक वारसा ‘एकदम कडक’ कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, २८ जानेवारीपासून सोमवार ते बुधवारी रात्री साडे नऊ वाजता फक्त कलर्स मराठीवर.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 5:10 pm

Web Title: adarsh shinde to host the new show ekdam kadak on colors marathi
Next Stories
1 ‘डोक्याला शॉट’मधून मिका सिंगचे मराठीत पदार्पण
2 ‘ठाकरे’साठी नवाजुद्दीन नव्हे तर या अभिनेत्याला होती पहिली पसंती
3 शिवानी बावकरचा ‘युथट्यूब’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X