बॉलिवूड गायक सोनू निगम सध्या लॉकडाउनमुळे दुबईमध्ये अडकला आहे. याची माहिती त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली. जवळपास ३ वर्षांपूर्वी सोनू निगमने अजान संबंधी एक ट्विट केले होते. जे सध्या पुन्हा चर्चेत आलं आहे. इतकंच नाही तर त्याला अटक करण्याचीही मागणी होऊ लागली आहे. यामध्येच गायक अदनान सामी याने सोनूची पाठराखण केल्यामुळे आता त्यालादेखील ट्रोल करण्यात येत आहे.

२०१७ मध्ये सोनू निगमने ‘मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते’, असं ट्विट केलं होतं. त्याच्या ट्विटनंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. इतकंच नाही तर यावरुन वादंग निर्माण झाला होता. त्यानंतर आता तीन वर्षांनी पुन्हा एकदा त्याचं ट्विट चर्चेत आलं आहे. अनेकांनी त्याला अटक करा असं म्हणत दुबई पोलिसांना टॅग केलं आहे. याप्रकरणी अदनान सामी यांनी सोनूची बाजू घेत एक ट्विट केलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्या टीकेचा मोर्चा अदनान सामी यांच्याकडे वळवला आहे.

‘सोनू निगम याचा आवाज, त्याची गाणी उत्तमच असतात. तो माझा भाऊ आहे आणि कायम राहिलं. सख्या भावाप्रमाणे माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्यामुळे तो कसा आहे मला ठाऊक आहे. तो कायम सगळ्यांचा आदर करतो. त्यामुळे कृपया त्याला एकटं सोडा. सोनू, मी तुझ्यासोबत आहे’, असं ट्विट अदनान सामी यांनी केलं होतं.

‘सोनू निगम हे उत्तम गायक आहेत, मान्य आहे. पण त्यांच्या मनात अन्य धर्मियांविषयी प्रचंड द्वेष आहे’, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर ‘हो सख्खा भाऊ आहे, जो अजानविषयी अशा कटू शब्दात टीका करतो’, असं अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.

दरम्यान, तीन वर्षांपूर्वी सोनूने ‘देव सर्वांचं भलं करो. मी मुस्लिम नसूनही सकाळी अजानच्या आवाजानेच मला जाग येते. भारतात बळजबरीने चालणाऱ्या या धार्मिक रुढी कधी थांबणार?’ असं ट्विट त्याने केले होते. त्याच्यानंतर अनेकांनी त्याला ट्रोल केलं होतं. त्यातच आता सोनू दुबईमध्ये असून त्याला तिथे अजानच्या आवाजाचा त्रास होत नाही का? असा प्रश्न विचारत नेटकऱ्यांनी त्याला पुन्हा ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.