धारावी, सायन, प्रतिक्षानगर, चुनाभट्टी येथील कष्टक-यांच्या मुला-मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी विविध उपक्रम राबविणा-या शिव शिक्षण संस्थेच्या डी. एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपलं वेगळेपण दाखवून दिलं आहे. मेघना गुलजार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजी’ या सिनेमातील सध्या गाजत असलेल्या ‘ए वतन, वतन मेरे, आबाद रहें तू’ हे देशभक्तीपर गाणं ख्यातनाम पार्श्वगायिका सुनिधी चौहान सोबत गाऊन रेकॉर्ड करण्याची संधी या शाळेतील सहा विद्यार्थ्यांना मिळाली.

चारच दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘राजी’ सिनेमातील ‘ए वतन, वतन मेरे, आबाद रहें तू’ हे गाणं सध्या सगळीकडे गाजत आहे. ज्येष्ठ गीतकार गुलजार यांनी शब्दबद्ध केलेल्या या गीताला संगीतकार शंकर-एहसान-लॉय यांनी संगीतबद्ध केलं आहे. सुनिधी चौहानसह डी. एस. हायस्कूलच्या सोहम वावेकर, अनन्या हलर्णकर, तेजस तांबे, अद्वैत रामशंकर, वसुधा तिवारी, गझल जावेद या सहा विद्यार्थ्यांनी हे गाणं गायलं आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी या गाण्याची तयारी फक्त एका तासात केली आणि त्यानंतर पुढच्या तासाभरातच संपूर्ण गाणे रेकॉर्ड करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या संगीत शिक्षिका अर्चना कामत हेगडेकर सांगतात, ‘गाण्याचा बराचसा भाग केवळ एकाच टेकमध्ये- पहिल्याच प्रयत्नात रेकॉर्ड करण्यात आला.’

बॉलिवूड सिनेमासाठी गाणं गाण्याच्या निमित्ताने या मुलांना संगीत क्षेत्रातील दिग्गजांना भेटण्याची संधीही मिळाली. ‘आम्ही जेव्हा रेकॉर्डिंग स्टुडिओमध्ये गेलो तेव्हा तिथे गीतकार गुलजार, गायिका सुनिधी चौहान आणि संगीतकार शंकर महादेवन उपस्थित होते. त्यांच्यासमोर गाणं आणि रेकॉर्डिंग करणं हा एक भन्नाट अनुभव होता’, असं सोहम वावेकर या इयत्ता नववीतील विद्यार्थ्याने सांगितलं.

‘शाळेतील सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण संगीतशिक्षण मिळावं, यासाठी डी. एस. हायस्कूलमध्ये एक सुसज्ज अशी संगीत कार्यशाळा (म्यूझिक रुम) आहे. या वर्गात तबला, पेटीपासून गिटार आणि पियानोपर्यंतची सर्व वाद्ये विद्यार्थ्य़ांसाठी उपलब्ध आहेत. शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये संगीत-गायनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून शाळेत शंकर महादेवन अकादमीच्या सहकार्याने वर्षभर संगीत वर्ग राबविले जातात. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील कलागुणांना वाव मिळतो,’ अशी माहिती डी. एस. हायस्कूलचे विश्वस्त-अध्यक्ष राजेंद्र प्रधान यांनी दिली.