असिफ बागवान

कोणतीही वेबसीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस कधी उतरते? जेव्हा तिचे सुरुवातीचे दोन-तीन भाग पाहणाऱ्याला खिळवून ठेवतात. सुरुवातीच्या भागांनंतर वेबसीरिजमधील कहाणी काहीशी संथ होते आणि मग शेवटच्या दोन-तीन भागांत तीत पुन्हा वेगाने पट पुढे सरकतो. वेबसीरिजच्या या फॉरमॅटबद्दल मागच्या एका लेखात सांगितलं होतंच. पण या वेळी पुन्हा त्याची आठवण करून देण्याचं कारण म्हणजे, एखादी वेबसीरिज अशीही निघते, जिच्या पहिल्या भागापासून अगदी शेवटच्या भागापर्यंतचे सगळे एपिसोड एकाच बैठकीत पाहून संपवावेत, असा मोह आवरता आवरत नाही. अशी वेबसीरिज अपवादानेच पाहायला मिळते. विशेषत: नवरंजनाच्या फलाटावर वेबसीरिजचा जो लोंढा येतो आहे, त्यातून अशा प्रकारची एखादी वेबसीरिज हाती लागणं किंवा नजरेस पडणं, हे जरा कठीणच बनलंय. कारण सुरुवातीला आश्वासक वाटणारी एखादी वेबसीरिजमध्ये कुठेतरी गंडते आणि मग प्रेक्षकांनाही आपण गंडल्याचा पश्चात्ताप होतो. सुदैवाने अ‍ॅमेझॉन प्राइमवरील ‘अफसोस’ ही त्याला पूर्णपणे अपवाद ठरते. नावात अफसोस असला तरी, ही वेबसीरिज पाहिल्यानंतर प्रेक्षकांना अजिबात पश्चात्ताप होणार नाही. उलट एखादी कहाणी वर्तुळाप्रमाणे एका टोकावरून सुरू होऊन पुन्हा त्याच टोकावर येऊन पूर्ण होते, तेव्हा तिच्या पूर्णत्वाचे पुरेपूर समाधान प्रेक्षकाच्या चेहऱ्यावर झळकते. ‘अफसोस’ हे त्याचं उत्तम उदाहरण.

अमरत्व किंवा ते देणारं अमृत हा मानववंशासाठी नेहमीच कुतूहलाचा मुद्दा राहिला आहे. पृथ्वीतलावरील सर्वात बुद्धिमान सजीव असलेल्या माणसाने विज्ञान तंत्रज्ञानात अचाट प्रगती केली असली तरी, अमरत्वाचा रामबाण मंत्र मात्र त्याला अद्याप शोधता आलेला नाही. सध्याच्या नवनवीन संशोधनांनी मानवाचं आयुर्मान कदाचित वाढवलं असेलही(खरं तर हाही वादाचाच मुद्दा, कारण पूर्वीची माणसं शंभर वर्षांहूनही अधिक जगायची!). मानवाचं सरासरी आयुर्मान वाढलं असलं तरी, त्याला अमर करणारं अमृत मात्र गवसलेलं नाही. एकीकडे कधीही न मरण्याची आस तर दुसरीकडे तेवढं चिरंतर आयुष्य लाभलं तर करायचं काय, या दोन टोकांच्या संकल्पना. ‘अफसोस’ एकाच वेळी या दोन्ही संकल्पनांदरम्यानचा प्रवास अगदी सहजतेनं आणि प्रेक्षकांना हसवत अंतर्मुख करून घडवून आणते.

अंथरुणाला खिळलेले आईवडील, दाराशीही उभं न करणारा भाऊ, एकदा नव्हे तीनदा झालेला प्रेमभंग, लेखक बनण्याच्या ईष्र्येने सोडलेली नोकरी आणि तरीही लेखनकलेत आलेलं अपयश अशा एकूणच नकारात्मक परिस्थितीचा बळी ठरलेला नकुल (गुलशन देवैया) याची जगण्याची इच्छा संपलेली आहे. पण अकरा वेळा वेगवेगळ्या पद्धतीनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न करूनही त्याला यश आलेलं नाही. त्याची मानसोपचारतज्ज्ञ श्लोका (अंजली पाटील) हिने परोपरी समजावूनदेखील नकुलचा आत्महत्येचा निर्धार ठाम आहे. म्हणूनच आत्महत्या करू इच्छिणाऱ्यांना सहज मृत्युलोकी धाडणाऱ्या ‘इमर्जन्सी एक्झिट’ या कंपनीकडे तो स्वत:च्याच ‘आत्महत्येचं’ कॉन्ट्रॅक्ट देतो. पण इथेही एकदा नव्हे तर दोनदा तो मरणातून वाचतो. याचदरम्यान त्याची भेट फोकटिया बाबाशी (रॉबिन दास) होते. उत्तराखंडमधील कोणत्या तरी आश्रमातल्या गुरूने दिलेली खऱ्याखुऱ्या अमृताची कूपी अमर असलेल्या व्यक्तीच्या हाती सोपवण्याची जबाबदारी घेऊन हा बाबा मुंबईत आलेला असतो. नकुलचा मरण्याचा हट्ट आणि त्यात त्याला आलेलं अपयश यातून फोकटिया बाबाला खात्री होते की, नकुल हाच अमर माणूस आहे. इकडे नकुलच्या आयुष्यातही काही घडामोडी अशा घडतात, ज्याने त्याची मरण्याची इच्छा नाहीशी होते. पण त्याच्या हत्येची सुपारी घेतलेली उपाध्याय (हीबा शाह) ही काही ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही. तिला नकुलला मारायचेच आहे. या सगळ्यांतून एक धमाल गोंधळ सुरू होतो. नकुल आणि उपाध्याय यांचा पाठशिवणीचा खेळ, त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात असलेली श्लोका, नकुलने अमृत ग्रहण करावं म्हणून फोकटिया बाबाची भुणभुण, याच अमृताच्या कुपीसाठी आश्रमातील सर्व साधूंना संपवून फोकटिया बाबाच्या मागे लागलेला परदेशी शास्त्रज्ञ आणि त्याची टोळी या सगळ्यांतून निर्माण होणारी एक डार्क कॉमेडी म्हणजेच अफसोस.

खरं तर अफसोसच्या कथेत आणि सादरीकरणात काही ठळक चुका आढळतात. पण ही कथा आपल्या मूळ सूत्रापासून ढळत नसल्याने आणि सादरीकरणातील चुका डार्क कॉमेडीचाच एक भाग वाटल्याने त्यावर आपसूक पांघरुण पडतं. नकुल आणि अमृताची ती कुपी या कथेचे केंद्रबिंदू आहेत. एपिसोड दर एपिसोड ही कथा नव्या वळणावर येऊन उभी ठाकते, पण केंद्रबिंदूपासून ती विरुद्ध दिशेला जात नाही. त्यामुळे शेवटी ती त्याच वळणावर येते, जिथून तिची सुरुवात झालेली असते. यातूनच अमृत आणि अमरत्व यांच्यावर प्रश्न उपस्थित केला जातो. आयुष्यात माणसाला सर्वच गोष्टी त्याच्या इच्छेनुसार मिळत नाहीत. काहींना तर अजिबातच मिळत नाही. यातलेच काही जण नैराश्यातून आत्महत्येच्या मार्गाची निवड करतात, पण मृत्यू ही तरी आपल्या हातातील गोष्ट आहे का? माणसाने इच्छा केली तरी त्याला मृत्यू सहज मिळत नाही. त्यामुळे आत्महत्येपासून परावृत्त झालेला नकुल जेव्हा शेवटी पुन्हा आत्महत्येकडे वळतो, तेव्हा तेदेखील वाटतं तितकं सोपं नसतं.

अमरत्व हे मानवाला निरंतर पडणारं एक गोंडस स्वप्न आहे. मात्र त्यामागच्या वास्तवाचा विचार कुणी करतच नाही. अमरत्व मिळाल्यावर काय करणार, याचं काही दशकांपुरतंच नियोजन आपण आखूही शकतो. पण त्या पुढचं काय? एका स्थानकातून निघालेली रेल्वेगाडी धडकधडक करत सुसाट जात असते, तेव्हा तिचं अंतिम स्थान ठरलेलं असतं. पण ज्याचा शेवटच नाही, त्या प्रवासाचा अनुभव किंवा आनंद तो काय, असा सवाल ‘अफसोस’ उभा करते.

दिव्या चॅटर्जी, अनिर्बन दासगुप्ता आणि सौरव घोष यांच्या पटकथेत दोष आहेत पण ती रटाळ नाही. कथेचा विषय निश्चितच वेगळा आहे आणि ती आपल्या केंद्रबिंदूशी पूर्णपणे प्रामाणिक आहे. अनुभूती कश्यप हिने दिग्दर्शन कौशल्यातून डार्क कॉमेडी उभी करण्यात आपले भाऊ (अनुराग, अभिनव) यांच्यापेक्षा तसूभरही कमी नसल्याचं दाखवून दिलं आहे. अभिनयाच्या बाबतीत प्रत्येक कलाकाराचं योगदान मोलाचं आहे. गुलशन देवय्या हा अभिनेता डार्क कॉमेडीपटावर सहजपणे वावरतो, हे त्याच्या याआधीच्या चित्रपटांतून दिसून आलं आहे. येथेही गोंधळलेला आणि निराश नकुल त्याने अप्रतिमपणे उभा केला आहे. मानसोपचारतज्ज्ञाच्या भूमिकेतली अंजली पाटील आणि उपाध्यायच्या भूमिकेतील हिबा शाह या दोघींनीही गुलशनइतकाच ताकदीचा अभिनय केला आहे. एकाच वेळी हसवत, खेळवत, थराराचा अनुभव देणारी कलाकृती पाहायचा आनंद दवडायचा असेल तर ‘अफसोस’ हे त्यावरचं ताजं आणि अचूक उत्तर आहे.