‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ चित्रपटाच्या यशानंतर अभिनेत्री कंगना रणौत पुन्हा एकदा दिग्दर्शक पदाची धुरा सांभाळणार आहे. ‘मणिकर्णिका’च्या माध्यमातून कंगनाने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं होतं. हा चित्रपट कमी कालावधीमध्ये तुफान लोकप्रिय झाला होता. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समर्थपणे पेलल्यानंतर आता ती आणखी एका चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाली आहे. एका सत्य घटनेवर आधारित चित्रपटाचं कंगना दिग्दर्शन करणार आहे. एका मुलाखतीमध्ये तिने याविषयी माहिती दिली.
“मणिकर्णिकाला मिळालेल्या यशानंतर मी आणखी एका चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. हा अॅक्श ड्रामा प्रकारात मोडणारा चित्रपट असून या चित्रपटासाठी संपूर्ण टीम प्रचंड मेहनत घेत आहे. सध्या या चित्रपटाच्या लुक्स आणि कथेवर काम सुरु आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित होईल”, असं कंगनाने यावेळी सांगितलं.
पुढे ती म्हणते, “मणिकर्णिकामध्ये मी दिग्दर्शक आणि अभिनेत्री अशी दुहेरी भूमिका पार पाडली होती. या चित्रपटाच्या यशानंतर माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. त्यामुळे आता मी या आगामी चित्रपटाचं दिग्दर्शन करण्यास सक्षम आहे असं मला वाटतंय”.
दरम्यान, सध्या कंगना ‘पंगा’ चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाचं नुकतंच दिल्लीत चित्रीकरण पूर्ण झालं असून या चित्रपटानंतर कंगना ‘मेंटल है क्या’ आणि ‘जयललिता’ यांच्या बायोपिकमध्ये झळकणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 11, 2019 11:37 am