पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पीएम नरेंद्र मोदी’ या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉय मोदींची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते अनावरण करण्यात आलं. मात्र पोस्टर लाँच झाल्यानंतर अवघ्या काही वेळात अनेकांनी विवेक ओबेरॉयला सोशल मीडियावर पुन्हा ट्रोल करायला सुरूवात केली आहे.

पोस्टर लाँच केल्यानंतर विवेकचा लूक पाहून अनेकांनी त्याची खिल्ली उडवली आहे. विवेक मेकअपमध्ये ओळखूही येत नाही. ना तो मोदींसारखा दिसतोय ना तो विवेक वाटतोय असं म्हणत त्याला सोशल मीडियावर ट्रोल करायला सुरूवात केली आहे. याआधी चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर देखील विवेकच्या निवडीवर अनेकांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहिल्यांदाच अभिनेत्यापेक्षा ज्या व्यक्तीवर बायोपिक आहे तोच उत्तम अभिनेता आहे, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया एका युजरने दिली होती.

https://twitter.com/Atheist_Krishna/status/1082251663086239744

https://twitter.com/SupariMan_/status/1081169539235082240

ओमांग कुमार या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. ओमांग कुमार यांनी यापूर्वी ‘मेरी कोम’, ‘सरबजीत’, ‘भूमी’ यांसारख्या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. याच महिन्यात या चित्रपटाच्या चित्रिकरणाला सुरूवात होणार आहे तर जुलै- ऑगस्ट महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची शक्यता आहे.