आपल्या अभिनयाने आणि विनोदाने प्रेक्षकांना हसवणारे कॉमेडियन राजीव निगम यांच्या मुलाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. राजीव यांच्या वाढदिवशीच त्यांच्या मुलाचे निधन झाल्याचे त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले. आता राजीव यांनी एका मुलाखतीमध्ये इंडस्ट्रीमधील लोकांपैकी फक्त मनिष पॉलने मदत केली असल्याचे म्हटले आहे.

नुकतीच राजीव यांनी ‘मिड डे’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी त्यांच्या कठिण काळाविषयी वक्तव्य केले आहे. ‘खरे सांगायचे झाले तर माझ्या कठिण काळात इंडस्ट्रीमधील मनिष पॉल सोडून इतर कोणीही मला मदत केली नाही. मनिषने मला केवळ आर्थिक मदतच नाही तर मानसिक आधार देखील दिला’ असे राजीव यांनी म्हटले.

राजीव निगम यांचा मुलगा देवराजचे ८ नोव्हेंबर २०२० रोजी निधन झाले आहे. त्यावेळी त्यांनी सोशल मीडियावर मुलासोबतचा फोटो शेअर करत ‘वाढदिवशी अशी भेट कोणी देतं का? माझा मुलगा देवराज आज मला सोडून गेला. माझ्या वाढदिवसाचा केक न कापताच गेला’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

राजीव यांनी ‘हर शाख पे उल्लू बैठा है’ या मालिकेत काम केले आहे. तसेच कॉमेडी सर्कस के अजूबे, कॉमेडी सर्कस का जादू, कॉमेडी सर्कस के सुपरस्टार, ये तो होना ही था अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे.