निलेश अडसूळ

‘अग्निहोत्र’ या शब्दाचा अर्थ काहीसा निराळा असला तरी हा शब्द उच्चारताच आपले लक्ष स्टार प्रवाहवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेकडे  वेधले जाते. एक अशी कलाकृती, ज्या कलाकृतीने मालिकांचा आशयच नव्हे तर मालिकांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलून टाकला होता. रात्री नऊच्या ठोक्याला कधी एकदा घरी जातो आणि टीव्हीपुढे बसतो, अशीच अवस्था प्रत्येकाची असायची. वाडा, आठ गणपती आणि त्याभोवती फिरणाऱ्या कथानकातून एकत्र आलेल्या अग्निहोत्रींच्या तीन पिढय़ा प्रत्येकाला गूढत्वाकडे घेऊन गेल्या. या आठवणींना उजाळा देण्याचे कारण म्हणजे ‘अग्निहोत्र’ ही मालिका पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.

‘स्टार प्रवाह’ वाहिनीला वेगळी ओळख निर्माण करून देणारी ही मालिका पुन्हा एकदा त्याच वाहिनीच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अद्याप या गूढ मालिकेबाबत कोणतेच रहस्य कळले नसले तरी नोव्हेंबर महिन्यात मालिका घराघरात प्रवेश करणार हे मात्र नक्की. ‘अग्निहोत्र’ मालिकेच्या पहिल्या पर्वाप्रमाणेच याही पर्वाचे कथानक श्रीरंग गोडबोले यांनी लिहिले असून ‘स्टार प्रवाह’चे कार्यक्रम प्रमुख दिग्दर्शक सतीश राजवाडे स्वत: या मालिकेचे दिग्दर्शन करणार आहेत. कथानकाबाबत अजून स्पष्टता आली नसली तरी, एका पिढीजात वाडय़ापासून मालिकेची सुरुवात होणार असल्याची माहिती मिळाली आहे. मालिका दहा वर्षांनी पुन्हा येत असली तरी नाशिकमध्ये असलेला पिढीजात वाडा आणि त्याभोवती काळाचा शोध घेणारे अग्निहोत्री याही पर्वात पाहायला मिळणार आहेत. मालिकेतील कलाकारांबद्दल गुप्तता पाळली असली तरी जुन्या मालिकेतील कलाकारांचा या मालिकेशी काही ना काही तरी संबंध असेल असा अंदाज वर्तवला जात आहे.

या मालिके विषयी कथाकार श्रीरंग गोडबोले सांगतात, जुन्या कथानकाचा कुठे तरी मी वास्तवात अनुभव घेतला होता, त्यातूनच कल्पनाविस्तार करत अग्निहोत्र साकारले गेले. कुटुंबापासून दूर गेलेली माणसे जेव्हा आपल्याच भूतकाळातील पाळामुळांचा शोध घेत जातात तेव्हा निश्चितच एक गूढ जन्माला येते. आणि तेच गूढ याही मालिकेचा आत्मा आहे. कुटुंब, जिव्हाळा, नाती हे जरी मालिकेचे केंद्रस्थान असले तरी त्याभोवती एक तत्त्व बांधले आहे आणि त्या तत्त्वाच्या शोधाची ही कथा आहे असे गोडबोले सांगतात. शिवाय आजवर के लेल्या मालिकांपैकी एक वेगळी आणि जिव्हाळ्याची ही मालिका आहे. आणि माझ्यासाठीच नव्हे तर या मालिकेतल्या प्रत्येक कलाकारासाठी ती तितकीच महत्त्वाची आहे. म्हणूनच मी कथाकार आणि निर्माता म्हणून पुन्हा एकदा ‘अग्निहोत्र’ घेऊ न येत आहे, असेही ते म्हणाले.

जुन्या मालिकेला दहा वर्षे होऊ न गेली तरी आजही लोक ‘अग्निहोत्र’ विषयी आवर्जून विचारतात. एखाद्या मालिकेचा इतका प्रभाव असणे हे अविश्वसनीय आहे. आणि म्हणूनच पुन्हा या मालिकेच्या निर्मितीचा विचार करण्यात आला. मालिकेविषयी सांगायचे तर वेध घेणारी मालिका असेल आणि पुन्हा एकदा प्रत्येक जण अग्निहोत्रींसोबत मालिकेत हरवून जाईल. जुनी मालिका काय होती हे प्रत्येकानेच पहिले असल्याने तो दर्जा टिकवणे ते आमच्यासाठीही आव्हान आहे. परंतु अभ्यासपूर्ण लेखन आणि दिग्दर्शनाची जोड देऊन एक चांगली कलाकृती मराठी रसिकांसाठी घेऊन येण्याचा प्रयत्न असेल.

सतीश राजवाडे (स्टार प्रवाह, कार्यक्रम प्रमुख)