स्टँडअप कॉमेडियन अग्रिमा जोशुआने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्यासंदर्भात वादग्रस्त विधान केलं होतं. पण सोशल मीडियावर काहीजणांनी तिच्यावर असभ्य भाषेत टीका केली होती. त्यानंतर तिने जाहिर माफी देखील मागितली. मात्र आता अग्रिमाने अनुपम खेर यांच्या एका विद्यार्थ्याने तिला अश्लील मेसेज केल्यामुळे त्यांना चांगलेच सुनावले आहे.

अग्रिमाने ट्विटरवर मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. हा स्क्रीनशॉट शेअर करत तिने ‘नमस्कार अनुपम खेर, तुमच्या अॅक्टर प्रिपेअर्स या कार्यशाळेत विद्यार्थी खूप चांगले शिक्षण घेत आहेत, हे पाहून आनंद झाला’, असे म्हणत अनुपम खेर यांना सुनावलं आहे.

आणखी वाचा : केतकी चितळेला नेत्याकडून धमकी; फेसबुकवर शेअर केला स्क्रीनशॉट

‘मला आलेल्या दहा हजार मेसेजमधील हा एक मेसेज आहे. अटक करुन आपल्याला जगातील लोकांची विचारसरणी बदलता येत नाही. परंतु मला वाटले की कदाचित मिस्टर खेर आपल्या शिष्यांच्या अवांतर गोष्टींबद्दल जाणून घेतल्यानंतर आनंदी असतील’ असे तिने पुढच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

तिने आणखी एक स्क्रीनशॉट शेअर करत अनुपम खेर यांना ट्विटमध्ये टॅग केले आहे. ‘नमस्कार अनुपम खेर, अनुपम खेर सर यांना माझे फोटो पाठव असे तो म्हणाला. मला असं दिसतय की तुम्हाला तुमच्या शिष्यांचा खूप अभिमान आहे. तुम्ही तुमच्या कार्यशाळेमध्ये या सर्व गोष्टी करण्यास प्रोत्साहन देता? वाह.. यावर बोलण्यासाठी माझ्याक़डे शब्द नाहीत’ असे तिने पुढे म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी अग्रिमा जोशुआला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रस्तावित पुतळ्यावरून व्यंगात्मक विधान केल्यावरुन थेट बलात्काराची धमकी देणाऱ्या इन्स्टाग्रामवरील शुभम मिश्रा या तरुणाला वडोदरा पोलिसांनी अटक केली. या प्रकरणामध्ये पोलिसांनी स्वत:च तक्रार दाखल करुन घेत मिश्राला ताब्यात घेतले होते. यासंदर्भातील माहिती पोलिसांनी ट्विटवरुन दिली होती.

काय आहे प्रकरण ?

उपहासात्मक विनोद करण्याच्या प्रयत्नात अग्रिमाने, “मुंबईजवळील अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाबद्दल मला जाणून घ्यायचे होते. म्हणून मी इंटरनेटवरील सर्वात विश्वासार्ह साईटवर गेले आणि ती म्हणजे क्वोरा” असे म्हटले. यापुढे तिने क्वोरावर या स्मारकाबद्दल काय काय लिहिले होते असे सांगताना, “मला तिथे एकाने लिहिलेला भलामोठ्या आकाराचा निबंध सापडला. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी शिवाजी पुतळा मास्ट्ररस्ट्रोक आहे. यामुळं महाराष्ट्राचं भलं होईल असं या निबंधामध्ये लिहिलं होतं. तर दुसऱ्या एकाला वाटलं की इथ क्रिएटिव्हिटी कॉंन्सेंट सुरु आहे. म्हणून त्याने तिथे, या स्मारकात जीपीएस ट्रॅकरसुद्धा असणार स्मारकाच्या डोळ्यात लेझर लाईट निघेल जिच्या माध्यमातून अरबी समुद्रातून येणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्म केला जाईल. तर एकाने तिथे येऊन तुमची माहिती नीट करुन घ्या आणि शिवाजी नाही, तर शिवाजी महाराज म्हणा, असं लिहिलं होतं… मी याच शेवटच्या व्यक्तीला फॉलो केलं,” असं अग्रिमा म्हणाली होती.