ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि आराध्या नवी वर्षाच्या स्वागतासाठी दुबईला रवाना झाले आहेत. या तिघांनाही नुकतेच मुंबई विमानतळावर पाहण्यात आले. तिघांच्या पोशाखामध्येही साम्य होते. तिघांनीही पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते. ऐश्वर्या आणि अभिषेकने निळ्या रंगाची जिन्स घातली होती. यंदा अनेक सेलिब्रिटी नवीन वर्षाचे स्वागत वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करताना दिसत आहेत. हृतिक रोशन त्याच्या दोन्ही मुलांसोबत सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी दुबईला गेला आहे. त्यांच्याबरोबर त्याची पूर्वाश्रमीची पत्नी सुझानही आहे. तसेच दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगही नवीन वर्षाचे स्वागत दुबईहून करणार आहेत.

दरम्यान, ऑस्कर पुरस्कारांसाठी पात्र ठरलेल्या ३३६ सिनेमांच्या लांबलचक यादीत भारताच्या ‘एम एस धोनी : दि अनटोल्ड स्टोरी’ आणि ‘सरबजीत’ या सिनेमांनी स्थान मिळविले आहे. सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी ऑस्कर स्पर्धेत असलेल्या सिनेमांची यादी ‘दि अकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस’ने बुधवारी जारी केल्याचे वृत्त ‘एंटरटेनमेंट वीकली’ने दिले होती. २०१६ च्या अकॅडमी पुरस्कारांच्या यादीत स्थान मिळवण्यासाठी सिनेमाला लॉस एंजल्समध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत सलग सात दिवस व्यावसायिक प्रदर्शन करणे अनिवार्य असते. तसेच ३५ एमएम किंवा ७० एमएमच्या फिल्मवर अथवा योग्य त्या डिजिटल स्वरूपातील सिनेमांचा कालावधी ४० मिनिटांहून अधिक असण्याची देखील अट असते. सुशांतसिंग राजपूत आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची भूमिका असलेल्या सिनेमांशिवाय, भारतीय- अमेरिकी सिनेनिर्मात्या मीरा नायर यांनी दिग्दर्शित केलेला ‘क्वीन ऑफ कटवे’चाही यादीत समावेश आहे.

सरबजीत या सिनेमात अभिनेता रणबीर हुडाने ‘सरबजीत’ची भूमिका साकारली होती.१९ मे रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमात ऐश्वर्या राय-बच्चन सरबजीतच्या बहिणीची (दलबीर कौर)ची भूमिका साकारली होती. तसेच रिचा चढ्ढा व दर्शन कुमार यांच्याही महत्त्वाच्या भूमिका दिसल्या होत्या. सरबजीत सिंह याने चुकीने पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केल्यानंतर त्याला पाकिस्तानच्या कारागृहात डांबले. तेथे त्याचा छळ करण्यात आला. त्याच्या सुटकेसाठी कुटुंबीयांनी खूप प्रयत्न केले, पण यशस्वी झाले नाहीत. कारागृहातच त्याचा मृत्यू ओढवला होता. या कथानकाला भारतीय सिनेचाहत्यांनी चांगलीच पसंती दिली होती.