प्रसिद्ध उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांच्या मुलीचं इशाचं आनंद पिरामल याच्याशी बुधवारी धुमधडाक्यात लग्न झालं. या सोहळ्यामध्ये क्रीडाविश्वापासून ते कलाविश्वापर्यंत आणि देशासह विदेशातील दिग्गज मंडळींनी हजेरी लावली होती. त्यामुळे हा लग्नसोहळा चर्चेचा विषय ठरला. त्यातच अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिचीदेखील सर्वाधिक चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं. ऐश्वर्याने लग्नामध्ये दीपिका पदुकोणला कॉपी करत सेम तिच्यासारखीच साडी नेसल्यामुळे अनेकांनी ऐश्वर्याला ट्रोल केलं. तर काहींनी तिला कॉपी कॅट म्हणून संबोधलं.

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया या निवासस्थानी इशा-आनंद विवाहबद्ध झाले. यावेळी अभिनेता अमिताभ बच्चनदेखील त्यांच्या परिवारासह या सोहळ्याची रंगत वाढविण्यासाठी आले होते. त्यात बच्चन कुटुंबाची सून अर्थात ऐश्वर्या पारंपारिक लूकमध्ये दिसून आली. यावेळी ऐश्वर्याने लाल रंगाची साडी नेसली असून त्यावर हेवी नेकलेसही घातला होता. ऐश्वर्याची ही साडी प्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केली होती. मात्र सेम अशीच साडी दीपिका पदुकोणने यापूर्वी एका कार्यक्रमात परिधान केली होती. त्यामुळे ऐश्वर्याने दीपिकाला कॉपी केल्याचं अनेकांनी म्हणत तिला ट्रोल केलं आहे.

दरम्यान, इशाचं लग्न थाटामाटात पार पडलं असून या लग्नासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. लग्नाच्या आधी जयपूरमधील सोहळ्यावर व विवाहावर एकूण मिळून ७२४ कोटी रुपयांचा खर्च झाल्याच्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पसरल्या. मात्र, रिलायन्स इंडस्ट्रीजमधल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा खूपच फुगवलेला आहे. सूत्रांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सगळा खर्च गृहीत धरला तर या विवाहावर झालेला एकूण खर्च १०० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले.