सिद्धार्थ मल्होत्राचा आगामी अय्यारी सिनेमाचे ‘याद है’ हे दुसरे गाणे प्रदर्शित झाले आहे. सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांना जेवढा आवडला तेवढीच या सिनेमातली गाणीही आवडत आहेत. सिद्धार्थ मल्होत्रा आणि रकुल प्रीत सिंह यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. मनावर दगड ठेवून सिद्धार्थपासून दूर जाणारी रकूल या गाण्यात दिसते. मनोज मुंतशिर याने हे गाणे लिहिले असून पलक मुच्चल आणि अंकित तिवारी यांनी हे गाणे गायले आहे.

‘ले डूबा’ हे अय्यारीचं पहिलं गाणं रकूलवर चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्यात ती सिद्धार्थसाठीचं तिचं एकतर्फी प्रेम व्यक्त करताना दिसते. तर या दुसऱ्या गाण्यात तिचं हृदय तुटताना दाखवण्यात आलं आहे. या गाण्याचे बोल ऐकण्यात प्रत्येकजण हरवून जाईल. सिद्धार्थ आणि रकुल यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हे गाणे शेअर केले आहे. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला होता. या ट्रेलरमध्ये मनोज वाजपेयी आणि सिद्धार्थ मल्होत्रा लष्करी अधिकाऱ्यांच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाची कथा दोन लष्करी अधिकाऱ्यांची आहे. ज्यांच्या काम करण्याच्या पद्धती पूर्ण वेगळ्या असतात. ही एका गुरू आणि शिष्य यांच्या खऱ्या आयुष्याची कथा आहे. अय्यारीमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा, मनोज बाजपेयी, पूजा चोप्रा, राकुल प्रीत, अनुपम खेर आणि नसीरुद्दीन शाह यांच्या मुख्य भूमिका आहेत.

नीरज पांडेने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. याआधी त्याने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’, ‘स्पेशल २६’, ‘बेबी’ या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. प्रदर्शनामध्ये अय्यारीचा सामना अक्षय कुमारच्या पॅडमॅन सिनेमाशी होणार होता. पण आता ‘पॅडमॅन’ आणि दीपिका पदुकोणचा पद्मावत सिनेमा एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यामुळे अय्यारीच्या निर्मात्यांनी सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.