दिवाळीमध्ये अजय देवगणचा बहुचर्चित ‘शिवाय’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. अजयचा हा आतापर्यंतचा सगळ्यात महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट मानला जातो. या सिनेमात त्याने फक्त अभिनयच केलेला नाही तर या सिनेमाच्या दिग्दर्शनाची आणि निर्मितीची जबाबदारीही त्याने स्वतः उचलली आहे. त्यामुळे साहाजिकच हा सिनेमा यशस्वी बनवण्यासाठी त्याने आवश्यक ते सगळंच केलं असणार. प्रेक्षकांना थक्क व्हायला लावणाऱ्या गोष्टी या सिनेमात दिसणार आहेत. आतापर्यंत बॉलिवूडच्या सिनेमात अशी गोष्ट कधीच दाखवली गेली नाही ती आता अजय ‘शिवाय’मध्ये दाखवणार आहे.
बॉलिवूड लाइफने दिलेल्या माहितीनुसार, अजयच्या या सिनेमात एक नाही तर तब्बल पाच खलनायक असणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय चार खलनायकांशी लढणार आहे. या चार खलनायकांना हरवल्यानंतरच त्याला पाचव्या खलनायकापर्यंत पोहोचता येणार आहे. आतापर्यंत या सिनेमात नक्की कोण खलनायक असणार आहे. हे प्रोमोमध्ये किंवा ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे हे पाच खलनायक कोण आहेत हे पाहण्याची उत्सुकता आता सिनेरसिकांना लागली आहे.
प्रेक्षक चित्रपटगृहात जाऊनच ‘शिवाय’चा क्लायमॅक्स बघतील असा पूर्ण प्रयत्न अजयने केला आहे. अजयने ऑन स्क्रिन यापुढे चुंबनदृश्य देणार नाही असे ठरवले होते. पण, काही दिवसांपूर्वी आलेल्या बातमीनुसार त्याने त्याचा हा निश्चयही मोडला. या सिनेमात तो अभिनेत्री एरिका कारसोबत चुंबनदृश्य देताना आणि काही इंटिमेट सीन देताना दिसेल. आतापर्यंत प्रदर्शित झालेले पोस्टर्स आणि ट्रेलरवरुन या सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.