मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळ गाजवलेला आणि ‘हिरो’ या शब्दाला साजेसा असा चेहरा म्हणजे ‘अजिंक्य देव’. एक गुणी अभिनेता अशी ओळख असलेला अजिंक्य देव लवकरच ‘झोलझाल’ या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करत आहे. २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘नागपूर अधिवेशन’ हा त्याचा मराठीतील शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर अजिंक्य देवने अभिनयाचा मोर्चा बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटसृष्टीत वळवला. अनेक हिंदी आणि इंग्लिश चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसून आलेला अजिंक्य देव हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘तान्हाजी’ या चित्रपटात सुद्धा तो महत्वाच्या भूमिकेत झळकला. आता ‘झोलझाल’ या आगामी मराठी चित्रपटात अजिंक्य देव ‘अभिमन्यू शिंदे’ या एका प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

प्रेक्षकांना अजिंक्य देव महत्वाच्या आणि मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अजिंक्य देवच्या अभिनयाचे वेगवेगळे पैलू रसिकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाविषयी अजिंक्य देव म्हणाला, “मराठीत बऱ्याच दिवसांनी काम करताना खूप आनंद होतोय. माझ्या इतर प्रोजेक्ट्समुळे व्यस्त असल्याने मी गेली काही वर्षे मराठी चित्रपटापासून दूर होतो. मराठी चित्रपट तर नक्कीच करायचा होता. मात्र मला हवी तशी भूमिका मिळत नव्हती. मी अशा भूमिकेची वाट बघत होतो जी माझ्यासाठीच बनली असेल. ‘झोलझाल’ चित्रपटाच्या निमित्ताने माझी ही इच्छा पूर्ण झाली. हा चित्रपट करण्यामागचं महत्वाचे कारण म्हणजे मला या चित्रपटातील माझी भूमिका प्रचंड आवडली. निर्माते मला माहिती देत असतानाच मी माझा निर्णय ठरवला होता. या चित्रपटातील माझ्या ‘अभिमन्यू’ या भूमिकेला विनोदी, गंभीर, तत्वनिष्ठ आदी असे अनेक पैलू आहेत. प्रेक्षकांना माझ्या अभिनयाचे विविध पैलू एकाच चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. अशा वेगळ्या पद्धतीचा अभिनय करायला मिळणार या विचारानेच मी खुश झालो आणि माझा होकार दिला. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा अॅक्शन करताना दिसणार आहे.”

आणखी वाचा : शाहरुख खानच्या सासूबाई अडचणीत; भरावा लागेल तीन कोटींचा दंड 

मानस कुमार दास दिग्दर्शित ‘झोलझाल’ या चित्रपटाची निर्मिती गोपाळ अग्रवाल, आनंद गुप्ता आणि संजना जी. अग्रवाल यांनी केली असून, सारिका ए. गुप्ता, विनय अग्रवाल हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर रश्मी अग्रवाल, स्वप्नील गुप्ता यांनी क्रिएटिव्ह प्रोड्युसर काम पाहिले आहे. अमोल कांगणे, आर्णव शिरसाट सहयोगी निर्माता तर शिवाजी डावखर यांनी या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मानस कुमार, संजीव सोनी आणि आनंद गुप्ता यांनी चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लिहिले आहे. येत्या १ मे ला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.