‘पद्मावती’ चित्रपटाला होणारा विरोध पाहता निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख बदलण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटाच्या कथानकामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणचा मोठ्या प्रमाणात विरोध केला जात आहे. काही दिवसांपूर्वीच करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी दीपिकाचे नाक कापण्याची धमकी दिली होती. त्यामागोमागच आता अखिल भारतीय क्षत्रिय महासभेनेही दीपिकाला धमकावले आहे. तिला जिवंत जाळणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

‘जर कोणी दीपिकाचेच जौहर केले तर त्या व्यक्तीला एक कोटींचे बक्षीस देण्यात येईल’, असे अखिल भारतीय क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष भुवनेश्वर सिंह यांनी जाहीर केले. ‘ज्यावेळी राणी पद्मावतीने राजवंशाच्या हितार्थ जौहर केला होता, त्यावेळी तिच्या मनात नेमक्या कोणत्या भावना होत्या याची जाणीव दीपिकाला व्हावी’, असा इशारा त्यांनी दिल्यामुळे चित्रपटाचा विरोध करणाऱ्यांमध्ये आणखी एका संघटनेची वाढ झाली आहे.

संजय लीला भन्साळी यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असणाऱ्या या चित्रपटाचा सुरुवातीपासूनच विरोध करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. ऐतिहासिक घटना आणि व्यक्तिरेखा या चित्रपटातून चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आल्याचा मुद्दा अधोरेखित करत या चित्रपटाचा विरोध करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये विरोधाच्या सर्व सीमा ओलांडल्या गेल्या असून कलाकारांनाही धमकावण्यात येत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सध्या पोलिसांकडूनही योग्य ती काळजी घेण्यात येत आहे.

Dhadak photos: बॉलिवूडमधील आर्ची-परश्या…

जौहर म्हणजे काय?
पूर्वी राजपूत महिला (राण्या) त्यांचे पती (राजे) युद्धावर गेल्यानंतर परिस्थिती बिघडत असल्याचे लक्षात येताच किंवा राजाला वीरमरण आल्यानंतर, शत्रूचा आपल्या किल्ल्याला वेढा वाढत असल्याचे लक्षात येताच शत्रूपासून आपली अब्रू वाचवण्यासाठी संपूर्ण साजश्रृंगार करुन अग्नीकुंडात उडी मारतात, त्यालाच जौहर म्हटले जाते.