अभिनेता अक्षय कुमारचं नागरिकत्व हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. आघाडीचा बॉलिवूड कलाकार असून त्याच्याकडे भारताचे नागरिकत्व नसल्याने अनेकदा त्याच्यावर टीकासुद्धा झाली. ‘टॉयलेट एक प्रेमकथा’सारख्या सरकारी सामाजिक योजनांचे महत्त्व पटवून देणारा, लागोपाठ देशभक्तीपर चित्रपटांतून काम करणारा अभिनेता अक्षय कुमार स्वत:च मतदानापासून वंचित राहिल्याने निवडणुकांवेळी तर हमखास टिकाटिप्पणी व्हायची. त्यामुळे अखेर अक्षयने भारताचं नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. ‘हिंदुस्तान टाइम्स लिडरशिप समीट’मध्ये त्याने हा खुलासा केला आहे.

अक्षयकडे कॅनडाचे पासपोर्ट आहे पण भारताचे अजूनही का नाही, असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. त्यावर अक्षय या मुलाखतीत म्हणाला, “भारतीय पासपोर्टसाठी मी अर्ज केला आहे. लोक एकच गोष्ट घेऊन बसतात याचं मला फार वाईट वाटतं. मी हिंदुस्तानी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला एक छोटीशी कॉपी दाखवावी लागेल आणि तो म्हणजे माझा पासपोर्ट. या गोष्टीमुळे मी दु:खी होतो. म्हणूनच मला कोणालाही ती संधी द्यायची नाही. मला लवकरच पासपोर्ट मिळणार असून भारतीय नागरिकत्व आता माझ्याकडे असेल.”

माझ्या देशाप्रती मला प्रेम नसतं तर माझ्या पत्नी व मुलांनाही कॅनडाचे नागरिकत्व घ्यायला भाग पाडले असते, असं त्याने त्याचा मुद्दा पटवण्यासाठी पुढे सांगितले. “माझ्या पत्नीलाही मी कॅनडीयन बनवलं असतं. माझी पत्नी, माझी मुलं भारतीयच आहेत. माझ्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती भारतीय आहे. मी माझे कर इथे भरतो. माझं आयुष्यच इथे आहे,” असं तो म्हणाला.

कॅनडाचे पासपोर्ट का घेतले?

कॅनडाच्या पासपोर्टबद्दल अक्षय या मुलाखतीत म्हणाला, “ही खूप जुनी गोष्ट आहे, जेव्हा माझे जवळपास १४ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले होते. त्यावेळी दुसऱ्या कामाचा विचार करत होतो. माझा एक मित्र कॅनडात राहत होता. त्याला माझ्या चित्रपटांविषयी सांगत होतो तेव्हा त्याने मला तिथे बोलावलं. तू इथे कॅनडात ये, आपण दोघं मिळून काही काम करू असं तो मला म्हणाला. तो मूळचा भारतीय असून कॅनडात कामासाठी गेला होता. त्यामुळे मी कॅनडाचा पासपोर्ट काढला. बॉलिवूडमध्ये माझं करिअर संपून जाईल या भीतीने मी तो काढला होता. पण माझ्या नशीबाने पंधरावा चित्रपट हिट झाला आणि तेव्हापासून मी कधी मागे वळून पाहिले नाही.”