बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित हॉरर कॉमेडी चित्रपट ‘लक्ष्मी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आता या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित झाले आहे. या पोस्टरमध्ये कियाराचा लूक समोर आला आहे.

नुकताच अक्षय कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर ‘लक्ष्मी’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करत ‘आता प्रत्येक घरात येणार लक्ष्मी. ९ नोव्हेंबर रोजी कुटुंबीयांसोबत तयार रहा’ असे त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे.

अक्षयने शेअर केलेल्या पोस्टरमध्ये कियाराचा लूक पाहाण्यासारखा आहे. सध्या सर्वत्र तिच्या या लूकची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच अक्षय कुमारच्या लक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलून लक्ष्मी असे ठेवण्यात आले आहे.

अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट ‘कंचना ’ या तामिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक असल्याचे म्हटले जात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटात एका ट्रान्सजेंडर भूताने अक्षयच्या शरीराचा ताबा मिळवलेला असतो. राघव लॉरेन्सने चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तसेच ओटीटी प्लॅटफॉर्म वितरकांनी या चित्रपटाचे हक्क तब्बल १२५ कोटी रुपयांना खरेदी केल्याचे म्हटले जात आहे. हा चित्रपट येत्या ९ नोव्हेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.