तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ असणारा गेम PUBG भारतात बॅन करण्यात आला आहे. भारतात तीन कोटींहून जास्त पबजी युजर्स असल्याचा रिपोर्ट आहे. आता या गेमला टक्कर देणारा दुसरा भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने ट्विट करत दिली आहे.

या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा २०% निधी हा जवानांना देण्यात येणार आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मोहिमेला पाठिंबा देत FAU-G हा गेम सादर करताना अभिमान वाटत आहे. करमणुकीव्यतिरिक्त, हा गेम खेळताना खेळाडू आपल्या सैनिकांच्या संघर्षाविषयी जाणून घेतील. या गेममधून मिळाणाऱ्या पैशांपैकी २०% निधी जवानांना देण्यात येणार आहे’ असे अक्षय कुमारने ट्विटमध्ये म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावाचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्र सरकारने काही चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा सरकारने ११८ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. यात तरुणांमध्ये सर्वात जास्त क्रेझ असलेल्या पबजी या गेमचाही समावेश आहे. माहिती व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६९ अ अंतर्गत पबजी मोबाइल गेमवर बंदी आणण्यात आली आहे. भारताचे सार्वभौमत्व, सुरक्षेशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी असल्याने ही कारवाई कऱण्यात आल्याचे मंत्रालयाने सांगितले आहे.