बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारच्या आगामी ‘हाऊसफुल ४’ च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली. सध्या या चित्रपटाचं जैसलमेर येथे चित्रीकरण सुरु असून अक्षय चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं पाहायला मिळत आहे. चित्रपटाच्या सेटवरील अक्षयचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यात तो प्रचंड मेहनत करताना दिसत आहे.

जैसलमेरमध्ये पोहोचल्यापासून अक्षय त्याच्या प्रत्येक घटनेचा अपडेट इन्स्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांपर्यंत पोहोचवत आहे. यातच त्याने आता नवा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अक्षय व्यायाम करताना दिसत आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अक्षयने गळ्यात एक मोठी रुद्राक्षाची माळ घातली असून या माळेच्या सहाय्याने तो मानेचा व्यायाम करताना दिसत आहे. ‘सकाळचं वातावरण मला कायमच आवडतं. पण जैसलमेरची सकाळ काही निराळीच आहे’, असं कॅप्शन अक्षयने या व्हिडिओला दिलं आहे.

पुढे तो असंही म्हणाला आहे, ‘माझ्या आयुष्यात व्यायामाला विशेष महत्व आहे. त्यामुळे मी कुठेही गेलो तरी न चुकता व्यायाम करतो. व्यायामामुळे एक नवी उर्जा मिळते ज्यामुळे तुमचा कायम चांगला राहतो’. अक्षयचा हा व्हिडिओ आतापर्यंत १० लाखांपेक्षा अधिक वेळा बघितला गेला आहे.