बॉलिवूडमध्ये सर्वांत फिट अभिनेता कोण आहे असा प्रश्न विचारल्यास अनेकांच्या तोंडून अक्षय कुमार हे नाव सर्वाधिक ऐकायला मिळेल. लवकर उठणे, लवकर झोपणे, व्यायाम, योग्य आहार या सर्व गोष्टींचं तो काटेकोरपणे पालन करतो. अनेकदा अक्षयने मुलाखतींदरम्यान त्याचा फिटनेस फंडा चाहत्यांना सांगितला. आपलं जीवनमान कसं असावं यावर त्याने नेहमीच भर दिला आहे. अक्षय काही दिवसांपूर्वीच ‘Into the wild’ या प्रसिद्ध शोमध्ये बेअर ग्रिल्ससोबत झळकला. बेअरसोबत त्याने इन्स्टाग्राम लाइव्हच्या माध्यमातून गप्पासुद्धा मारल्या. मी दररोज गोमूत्र पितो, असं अक्षयने या गप्पांदरम्यान सांगितलं आणि सध्या सोशल मीडियावर त्याचीच जास्त चर्चा आहे.

या लाइव्हदरम्यान अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशीसुद्धा होती. “हत्तीच्या मलापासून तयार झालेला चहा पिण्यासाठी तू कसा तयार झाला?”, असा प्रश्न हुमाने अक्षयला विचारला. त्यावर अक्षय म्हणाला, “तो चहा पिण्याआधी मला काहीच वाटलेलं नाही. कारण एकंदरीत त्या शोसाठी मी फारच उत्सुक होतो आणि तसंही मी दररोज गोमूत्र पितो त्यामुळे मला हत्तीच्या मलापासून तयार झालेला चहा पिण्यात काहीच वेगळं वाटलं नाही.”

आणखी वाचा : ड्रग्स प्रकरणी रियाने साराचं नाव घेताच सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

मी गोमूत्र पितो हे अक्षयने सांगितल्यानंतर नेटकऱ्यांकडून इंटरनेटवर त्याचे फायदे, ते कसं पितात याविषयीच्या सर्चला ऊत आला. आयुर्वेदात गोमूत्र पिण्याचे कोणते फायदे सांगितले आहेत, त्याने काय होतं याविषयी इंटरनेटवर जोरदार सर्च करण्यात आलं. इतकंच नव्हे तर अक्षयच्या या लाइव्ह सेशननंतर ट्विटरवर गोमूत्र ट्रेण्ड झालं होतं.