अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येमुळे बॉलिवूडमधील घराणेशाहीविरोधात पुन्हा एकदा आवाज उठवला जात आहे. स्टार किड्सवर सोशल मीडियाद्वारे जोरदार टीका होत आहे. अनेक नामांकित कलाकार या मक्तेदारीचा विरोध करत आहेत. दरम्यान आता अभिनेता अक्षय कुमार याने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीवर निशाणा साधला आहे. माझ्या मुलांना घराणेशाहीचा फायदा बिलकूल मिळणार नाही असं त्याने सांगितलं आहे.

रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत अक्षयने घराणेशाहीवर भाष्य केलं. तो म्हणाला, “घराणेशाही प्रत्येक क्षेत्रात आहे. तुम्ही कोणालाही त्यांच्या कुटुंबियांना काम देण्यापासून थांबवू शकत नाही. आई-वडिलांच्या ओळखीवर एखाद्या व्यक्तीस संघर्ष केल्याविणा संधी मिळू शकते. पण मेहनत केल्याशिवाय घराणेशाहीच्या आधारावर दिर्घकाळ टिकता येत नाही. अशी अनेक उदाहरणं तुम्हाला बॉलिवूडमध्ये पाहायला मिळतील. आरव आणि नितारा या माझ्या दोन्ही मुलांना मी आत्मनिर्भर होण्याचे संस्कार दिले आहेत. त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं असेल तर माझ्या स्टारडमचा फायदा मी घेऊ देणार नाही. त्यांनी स्वत: ऑडिशन द्यावी आणि कामं मिळवावी अशी माझी अपेक्षा आहे. कारण संघर्ष केल्याशिवाय यशाचा खरा आनंद त्यांना मिळणार नाही.” अक्षय या मुलाखतीमुळे सध्या चर्चेत आहे.