अक्षय कुमार आणि भूमी पेडणेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर यशस्वी ठरला. भारतातील ग्रामीण भागात शौचालयांचा अभाव आणि त्यामुळे स्थानिकांना विशेषत: महिलांना होणारा त्रास या गोष्टी चित्रपटातून अधोरेखित करण्यात आल्या आहेत. या चित्रपटाच्या सिक्वलची बरीच चर्चा होती आणि आता अक्षय कुमारने ट्विटरवर ‘टॉयलेट २’ या हॅशटॅगसह एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामुळे हा व्हिडिओ चित्रपटाच्या दुसऱ्या भागासंदर्भात तर नाही ना अशी जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे.

‘पुढच्या ब्लॉकबस्टरसाठी तयार राहा, मिशन ‘टॉयलेट २’. यावेळी संपूर्ण देश बदलणार,’ असं कॅप्शन देत अक्षयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ‘शौचालय तर बनवलं पण कथा अजून बाकी आहे. मी घेऊन येतोय ‘टॉयलेट पार्ट २’,’ असं तो यामध्ये म्हणत आहे. या व्हिडिओमुळे ट्विटरवर #Toilet2 हा हॅशटॅग ट्रेण्ड होऊ लागला. त्यामुळे हे नेमकं कशासंदर्भात आहे याचा तर्क नेटकरी लावू लागले आहेत. अनेकांनी ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’चा सिक्वल येणार असा अंदाज लावला आहे. पण या जुलैमध्ये ‘टॉयलेट २’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं अक्षय व्हिडिओत म्हणताना दिसतोय. सध्या तो ‘केसरी’ आणि ‘गोल्ड’ या चित्रपटांमध्ये व्यग्र असताना इतक्या लवकर जुलैमध्ये हा चित्रपट कसा प्रदर्शित होणार हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्वच्छ भारत अभियानाशी संबंधित एखादी गोष्ट असल्याचाही अंदाज अनेकजण बांधत आहेत. हा चित्रपट आहे की एखादी जाहिरात की मोहिम, याबाबत आता अक्षय स्वत:च खुलासा करू शकेल. मात्र तोपर्यंत प्रेक्षकांची उत्सुकता ताणण्यात अक्षय यशस्वी ठरलाय हे नक्की.