Video : दिमाग हिल गया क्या? लॉकडाऊन असतानाही बाहेर फिरणाऱ्यांवर भडकला अक्षय कुमार
सरकारने लॉकडाऊन जाहीर केले असतानाही काही रस्त्यांवर लोकांची गर्दी पाहायला मिळतेय. विनाकारण लोक बाहेर फिरताना दिसत आहेत. अशा लोकांवर अभिनेता अक्षय कुमार भडकला. ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत अक्षयने संताप व्यक्त केला. मी नेहमी तुम्हाला प्रेमाने समजावतो, पण आज मला इतका राग येतोय की जर काही चुकीचे शब्द तोंडून निघाले तर माफ करा, असा तो व्हिडीओच्या सुरुवातीलाच सांगत आहे.

काय म्हणाला अक्षय?

लोकांचं डोकं फिरलंय का? काय झालंय लोकांना? कोणाला लॉकडाऊनचा अर्थ समजत नाहीये. घरी राहा असा त्याचा अर्थ होतो. कुटुंबीयांसोबत राहा. रस्त्यावर भटकायला जाऊ नका. बाहेर जाऊन तुम्ही फार धाडसी बनण्याचा प्रयत्न करत आहात. पण तुमचं धाडस तिथेच संपेल. स्वत:सुद्धा रुग्णालयात जाल आणि कुटुंबीयांनाही जाण्यास भाग पाडाल. डोक्याचा थोडा तरी वापर करा. हात जोडून तुम्हाला विनंती करतो. मी चित्रपटात स्टंट करतो, गाड्या उडवतो, हेलिकॉप्टरवर लटकतो…पण खरंच आता सांगतो की परिस्थिती खूप वाईट आहे. संपूर्ण जगाची परिस्थिती वाईट आहे. तुम्ही फक्त घरी राहा. जोपर्यंत सरकारने सांगितलंय तोपर्यंत घरी राहा. आपल्याला करोनाला हरवायचं आहे. आपल्याकडे दुसरा पर्याय नाही.

आणखी वाचा : संकट दाराशी उभं असताना गुढीपाडव्याची खरेदी करायला बाहेर पडू नका- शरद पोंक्षे

जगभरातच नाही तर देशातही करोना विषाणूची दहशत पसरली आहे. महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या १०० वर गेली आहे. त्यामुळे घराबाहेर पडू नका असं आवाहन सेलिब्रिटींकडून वारंवार करण्यात येत आहे.