अभिनेता अक्षयकुमार याला ब्रिटनमध्ये स्थलांतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी हिथ्रो विमानतळावर बराच काळ थांबवून ठेवले कारण त्याच्याकडे कॅनेडियन पासपोर्ट होता. अक्षयकुमार मुंबईहून लंडन येथे विमानाने आला असता त्याला विमानतळावर थांबवून ठेवण्यात आले. तो रूस्तम या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला आला आहे पण त्याला दीड तास ताटकळत ठेवण्यात आले. कॅनडाचा पासपोर्ट असल्याने कॅनडातून आलेल्या व्यक्तीने कुठल्या गोष्टींची पूर्तता करणे आवश्यक असते त्या दृष्टिकोनातून अक्षयकुमारकडील कागदपत्रे तपासण्यात आली. अक्षयकुमारला स्थानबद्ध करण्यात आल्याचे सांगण्यात येत असले तरी ते खरे नाही. नंतर अक्षयकुमारला झालेल्या विलंबाबत अधिकाऱ्यांनी दिलगिरीही व्यक्त केली व नंतर तो त्याच्या कामासाठी मोकळा झाला. अक्षयकुमार हा कॅनेडियन नागरिक असून त्याला ब्रिटनमध्ये ९० दिवसांच्या काळासाठी जाण्याकरिता व्हिसा लागत नाही, कारण कॅनडाच्या नागरिकांना ती सवलत दिलेली आहे.