काही दिवसांपूर्वीच अभिनेता अक्षय कुमारचा ‘जॉली एलएलबी २’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सध्या हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर चांगली छाप पाडत असून समीक्षकांनीही या चित्रपटाला चांगली दाद दिली आहे. अन्नू कपूर, सौरभ शुक्ला आणि अक्षय कुमार यांच्या दर्जेदार अभिनयाने परिपूर्ण अशा या चित्रपटाच्या डिलिटेड सीनचा एक व्हिडिओ खिलाडी कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे.
या व्हिडिओमध्ये हे तिन्ही कलाकार दिसत असून कोर्टात सुरु असलेल्या मध्यान्न भोजनाच्या विश्रांतीच्या वेळीचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये अन्नू कपूर यांचा प्रवेश होताच ‘अरे वा…इथे तर सर्वजण एकत्र जेवत आहेत’, असे ते जेव्हा म्हणतात तेव्हा अनेकांचेच लक्ष वेधले जात आहे. या व्हिडिओमध्ये दाखवलेली ही दृश्ये पाहता चित्रपटातून या दृश्यांना का वगळण्यात आले होते याचा अंदाज देत आहे. पण, चित्रपटातून हे दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकले नसले तरीही खिलाडी कुमारने त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे एका वेगळ्या मार्गाने हा व्हिडिओ प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला आहे असेच म्हणावे लागेल.
अक्षय कुमारच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी शुक्रवारी १३.२० कोटी, दुस-या दिवशी म्हणजेच शनिवारी १७.३१ कोटी तर तिस-या दिवशी रविवारी १९.९५ कोटी, ,सोमवारी ७.२६ कोटी आणि मंगळवारी ९.०७ कोटींचा गल्ला जमविला आहे. प्रसिद्ध व्यापार आणि चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी ट्विट करून ‘जॉली एलएलबी २’ च्या कमाईचा आकडा ट्विट केला आहे. दरम्यान, भारतात चांगली कमाई करत असलेल्या या चित्रपटावर पाकिस्तानमध्ये मात्र बंदी घालण्यात आली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 20, 2017 3:52 pm