एका पाकिस्तानी गायिकेने अभिनेता आणि संगीतकार अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. याप्रकरणी अलीने तिचे सर्व आरोप फेटाळत मानहानीचा दावा केला आहे.

‘माझ्यावर करण्यात आलेले आरोप खोटे असून त्या व्यक्तीने माझी जाहीर माफी मागावी अन्यथा माझी प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई द्यावी’, असे अलीकडून पाठविण्यात आलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

वाचा: शाहिद लवकरच दिसणार बॉक्सरच्या भूमिकेत ?

संबंधित महिलेने काही दिवसांपूर्वी ट्विटरच्या माध्यमातून अली जफरविरोधात लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. हा आरोप केल्यानंतर त्या महिलेला ही पोस्ट ट्विटरवरुन काढून टाकण्यासाठी नोटीसही पाठविण्यात आली होती. पाठविण्यात आलेल्या नोटीशीमध्ये नमूद केल्याप्रमाणे महिलेला दोन आठवड्यांच्या आत अलीची माफी मागावी लागेल. तसेच तिने माफी न मागितल्यास तिला १० कोटी रुपयांची नुकसानभरपाई अलीला द्यावी लागेल. तर अशा प्रकारची कोणतीच नोटीस अद्याप मिळाली नसल्याचं संबंधित महिलेच्या वकिलांकडून सांगण्यात येत आहे.
अली जफरने ‘तेरे बिन लादेन’, ‘लव का दी एन्ड’, ‘मेरे ब्रदर की दुल्हन’, ‘चष्मेबद्दुर’, ‘किल दिल’ या चित्रपटांत भूमिका साकारली असून तो ‘डियर जिंदगी’ या चित्रपटातही झळकला आहे.