अवघ्या 19व्या वर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी ‘पटाखा गुड्डी’ अभिनेत्री आलिया भट्ट हिचा आज वाढदिवस. गेल्या सहा वर्षांत तिने दमदार अभिनयाच्या जोरावर आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलं. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ या चित्रपटानंतर तिच्या यशाचा आलेख वरच चढत गेला आहे. बालपणीच्या आवडीनिवडी आणि चित्रपटसृष्टीत येण्याचा निर्णय याबद्दल आलियाने काही गोष्टी सांगितल्या आहे.

आलिया : माझी आई तिच्या किटी पार्टीजना मला घेऊन जायची. तासनतास टीव्ही बघणं फार आवडायचं मला. बहुतेकदा मी बाहुल्यांशी खेळताना स्वत:शीच बोलत बसायचे. बाथरूममध्ये असतानाही माझी अखंड टकळी चालू असायची असं आई सांगते. टीव्हीवर गोविंदा-करिश्मा कपूर यांचे सिनेमे लागत तेव्हा त्यांचं नृत्य मला विलक्षण आवडायचं. मी सातवीत असताना वडिलांना म्हटलं होतं, ‘मला यापुढे अभ्यास करायचा नाहीये. मेरे लिये कोई फिल्म बना डालो.’

ते चमकले! ‘फिल्म में काम करोगी आलू? (आलियाचे घरगुती टोपण नाव) क्यों? अ‍ॅक्टिंग अच्छी लगती है तुम्हे?’

यावर मी त्यांना म्हणाले, ‘अॅक्टिंग का तो पता नहीं, लेकिन गोविंदा-करिश्मा जैसे डान्स करना है मुझे। कहीं भी! एअरपोर्टपर, गार्डन में, रोडपर! शाळेत फक्त वार्षिक स्नेहसंमेलनातून डान्स करायला मिळतो!’

मला सिनेमांचे आकर्षण होते. मला वाटायचं, कलाकारांना फक्त उत्तमोत्तम कपडे घालून ऊठसूट डान्स करायचा असतो.. माझ्यासाठी फिल्म्स म्हणजे फक्त डान्स होता!’

आलियाने शाळेत असतानाच बॉलिवूडमध्ये येण्याचा आपला मनसुबा चित्रपट निर्माते असलेल्या आपल्या वडिलांसमोर जाहीर केला होता. तिला खात्री होती, तिचे वडील तिलाही लाँच करतील. कारण बॉलिवूडमध्ये आजवर त्यांनी अनेकांना लाँच केलं होतं. पण तिचा भ्रमनिरास झाला.

माझ्या मोठय़ा बहिणीला पूजाला त्यांनी लाँच केलं. मी पप्पांच्या ‘संघर्ष’ सिनेमात प्रीती झिंटाच्या लहानपणीची भूमिका केली होती. पप्पा मला लाँच करतील असं मला वाटत होतं, पण तशी काही हालचाल मला दिसेना. उलट आई आणि पप्पांनी एक प्रकारे माझं बौद्धिकच घेतलं. त्यांचं दोघांचंही मत होतं की माझ्यात अभिनयक्षमता असेल तर ती कोणत्याही चित्रपट निर्मात्याच्या सिनेमात दिसून येईल. उलट घराबाहेरच्या निर्मात्यांनी मला संधी दिली तर स्वत:ला जोखणं अधिक सोपं जाईल. थोडक्यात पपा मला लाँच करणार नव्हते. मी नाराज झाले खरी, पण माझ्यातील फिल्मी किडा पाहून करण जोहरने त्याच्या ‘स्टुडण्ट ऑफ द ईअर’मध्ये मला लाँच केलं. त्या वेळेस मी १९ वर्षांची होते. ‘स्टुडण्ट ऑफ द इअर’ला घवघवीत यश मिळालं.

-पूजा सामंत