आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रानं ‘स्टुडंट ऑफ द इअर’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या दोघांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडली त्यानंतर आलिया -सिद्धार्थ ‘कपूर अँड सन्स’ चित्रपटातही दिसले. यादरम्यानच्या काळात या दोघांच्याही अफेअरच्या चर्चा बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या.

अनेक सार्वजनिक ठिकाणी हे जोडपं दिसू लागलं. या दोघांची रिल आणि रिअल लाइफ जोडीही प्रेक्षकांना खूपच आवडली. मात्र या दोघांची ‘लव्हस्टोरी’ फार काळ टिकली नाही. दोघांचंही ब्रेकअप झालं. आता सिद्धार्थ सिंगल असला तरी आलिया रणबीर कपूरला डेट करत आहे. आलिया आणि सिद्धार्थ दोघांच्या वाटा वेगळ्या असल्या तरी सिद्धार्थविषयी मला खूप आदर आहे असं आलिया म्हणाली.

आलियाला तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर सिद्धार्थविषयी विचारण्यात आलं तेव्हा तिनं त्याच्याविषयी अनेक चांगल्या गोष्टी सांगितल्या. ‘सिद्धार्थविषयी माझ्या मनात खूप आदर आणि प्रेमाची भावना आहे. आम्ही दोघांनी या क्षेत्रात एकत्र पाऊल ठेवलं. मी त्याला खूप चांगलं ओळखते आणि खरं सांगायचं तर आम्हा दोघांमध्ये कोणताच वाद नव्हता. त्याच्याविषयी माझ्या मनात सकारात्मक भावना आहे. भूतकाळाविषयची कटुता मनातून काढून टाकली तर दोघांना मित्र या नात्यानं एकत्र यायला काहीच हरकत नाही’ असंही आलिया म्हणाली.