अभिनेत्री कंगना रणौत ही तिच्या सडेतोड वक्तव्य आणि बोचऱ्या मतांसाठी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. तिच्या टीकेची तोफ कधी कोणावर डागेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वी कंगनाने अभिनेत्री आलिया भट्टवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर आलियानेदेखील अत्यंत शालीनतेने कंगनाला प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र आता आलिया भट्टचे वडील दिग्दर्शक महेश भट्ट यांनी कंगनाला एकेकाळी चप्पल फेकून मारल्याचे रंगोलीने ट्विटरद्वारे सांगितले आहे. त्यावर महेश भट्ट यांची पत्नी सोनी राजदान यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

रणौत बहिणींद्वारे लावण्यात येणाऱ्या आरोपांना सोनी यांनी प्रत्युतर देणे टाळले आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीमध्ये सोनी यांना मेहेश भट्ट यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्यांनी, ‘मला या प्रकरणात पडायचंच नाही’ असे उत्तर दिले.

दरम्यान कंगनाने आलियावर टीका केल्यानंतर सोनी राजदान यांनी ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला उद्देशून खोचक टीका केली होती. ‘महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला. पण हीच कंगना सतत महेश भट्ट यांच्यावर, पत्नी व मुलीवर टीका करतेय. यावर मी काय बोलू ? हे असे सारे करण्यामागे तिचा हेतू तरी काय? ’,असे ट्विट सोनी राजदान यांनी केले होते. त्याचे हे ट्विट पाहिल्यानंतर रंगोलीने त्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

“मुळात महेश भट्ट यांनी कंगनाला चित्रपटामध्ये ब्रेक दिला हा भ्रम दूर करा. कंगनाला खरा ब्रेक अनुराग बासू यांनी दिला आहे. ज्या चित्रपटातून कंगनाने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, त्या चित्रपटामध्ये महेश भट्ट केवळ क्रिएटीव्ह डायरेक्टर म्हणून काम करत होते. इतकेच नाही तर महेश भट्ट यांनी कंगनाला धोखा चित्रपटासाठी विचारले होते. मात्र या चित्रपटासाठी तिने नकार दिल्यानंतर महेश भट्ट यांनी कंगनाला बरंच काही खरे-खोटे सुनावले. विशेष म्हणजे ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर ‘लम्हे’ चित्रपटाच्या प्रिव्ह्युदरम्यान त्यांनी कंगनाला चप्पल सुद्धा फेकून मारली होती. यावेळी कंगना केवळ १९ वर्षांची होती. या वयात मनावर असा आघात झाल्यानंतर कंगना ती रात्रभर रडत होती. तिचा चित्रपट तिलाच पाहू दिला नव्हता आणि त्यात तिला अपमानित करुन बाहेरदेखील काढण्यात आले होते”, असे प्रत्युत्तर रंगोलीने सोनी यांना दिले