‘अलिसा’ला उत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार

औरंगाबाद : ‘भक्षक’, ‘माणसं’ या ‘लोकसत्ता’च्या एकांकिका स्पर्धेतून चमकदार कामगिरी करणारा दिग्दर्शक आणि अभिनेता रावबा गजमल यांनी भूमिका केलेल्या ‘अलिसा’ या लघुचित्रपटास काश्मीर वर्ल्ड फिल्म फेस्टिव्हलमध्ये उत्कृष्ट लघुचित्रपट निर्मितीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. रावबा गजमल या अभिनेता आणि दिग्दर्शकाने मराठवाडय़ातील प्रश्नांवर केलेल्या एकांकिका चमकदार कामगिरी करत आहेत.

२०१३ मध्ये नाटय़शास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या रावबा गजमल यांची कामगिरी दिवसेंदिवस बहरत आहे. लोकसत्ताच्या लोकांकिका स्पर्धेत रावबाला उत्कृष्ट दिग्दर्शनाचे पारितोषिक मिळाले होते. वर्णभेदावर आधारित बापू घोंक्षे लिखित ‘यातना उत्सव’ या पहिल्या एकांकिकेनंतर रावबा गजमल यांनी वेगळ्या धाटणीच्या एकांकिका बसवायला सुरुवात केली. अण्णा भाऊ साठे यांच्या कथा हा रावबाचा आवडता विषय. ‘स्मशानातील सोने’ या कथेवर त्यांनी ‘मसनातलं सोनं’ नावाची एकांकिका दिग्दर्शित केली. ती ‘लोकसत्ता’ लोकांकिका स्पर्धेत महाअंतिम फेरीत पोहोचली. त्यानंतर प्रा. रविशंकर झिंगरे लिखित ‘भयरात्र’ हे दोन अंकी नाटक गजमल यांनी दिग्दर्शित केले आणि त्याला राज्य नाटय़ स्पर्धेत तृतीय पारितोषिक मिळाले.

वन्यजीव आणि माणसांमध्ये संघर्ष दाखवणारी ‘भक्षक’ नावाची एकांकिका लोकांकिका स्पर्धेत प्रथम आली होती. त्याचे अनेक प्रयोग राज्यात आणि राज्याबाहेर झाले. ‘बर्बाद्या कंजारी’ या  अण्णा भाऊ साठे यांच्या कथेवर आधारित ‘बर्बाद्या’ ही एकांकिकाही गाजली. वेगळ्या प्रकारच्या कथांचा नाटय़ाविष्कार घडविणारे रावबा गजमल यांनी कोलकाता फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘कातडं’ या लघुपटात काम केले आहे. अलीकडेच काश्मीर प्रश्नावर भाष्य करताना आणि कट्टरता संपविण्यासाठी संवाद आणि प्रेम या दोन गोष्टी आवश्यक असतात, असा संदेश देणाऱ्या ‘अलिसा’ या लघुपटात रावबा गजमल यांनी अभिनय केला आहे. त्याच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक होत असून या लघुपटास सर्वोत्कृष्ट लघुपट म्हणून पारितोषिक देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

नेहमीच्या पद्धतीने दिग्दर्शित होणाऱ्या एकांकिकाऐवजी नवीन प्रयोग करण्याचे आम्ही ठरवले होते. ग्रामीण भागातील कलाकारांना घेऊन आम्ही बसविलेल्या एकांकिकांना सर्वत्र मान्यता मिळते आहे. याचा आनंद आहेच. त्याचबरोबर ‘अलिसा’मधील भूमिकाही वैशिष्टय़पूर्ण ठरली. आता या लघुपटास पारितोषिक मिळाल्यामुळे आनंद असल्याची प्रतिक्रिया रावबा गजमल यांनी व्यक्त केली.