नाना पाटेकरांनी सिंटाच्या (सिने अॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) नोटिशीची दखल घेत उत्तर दिल्यानंतर आता आलोक नाथ यांनीही सिंटाच्या नोटिसीची गंभीरपणे दखल घेतल्याचे समोर येत आहे. मी टूप्रकरणी आधी आलोक नाथ यांनी सिंटाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आता आपल्यावर कारवाई होऊ शकते हे लक्षात येताच आलोक नाथ यांनी कोर्टाचा आदेश येत नाही तोपर्यंत आपल्याला काढून टाकू नये अशी विनंती केल्याचे वृत्त आहे.

विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर 19 वर्षापूर्वी बलात्कार केल्याचा आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आलोक नाथ यांनी बलात्कार झाला असेल परंतु तो मी केलेला नाही असा बचाव केला होता. नंदा यांनी कोर्टात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तर सिंटानं आलोक नाथ यांना नोटीस पाठवली. मात्र, आलोक नाथ यांनी सिंटाच्या नोटिसीकडे दुर्लक्ष केले होते. गुरूवारी नाना पाटेकरांनी तनुश्री दत्ता प्रकरणी सिंटाकडे आपले म्हणणे मांडल्यावर आता आलोक नाथ यांनीही सिंटाकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केल्याचे व कोर्टाचा आदेश येईपर्यंत संघटनेतून काढून न टाकण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे.

विशेष म्हणजे आलोक नाथ यांच्याविरोधात सिनेसृष्टीतील अनेक प्रतिष्ठित महिलांनी आपलं मत मांडलं असून दारू प्यायल्यावर आलोक नाथ यांचं वागणं महिलांप्रती अशोभनीय असायचं व त्यांना टाळायला लागायचं असं सांगितलं आहे. यामुळे विनता यांची बाजू भक्कम झाली असून सुरूवातीला ताठर भूमिका घेणारे आलोक नाथ काहिसे मवाळ झाल्याचे दिसत आहे.

सिंटाचे सदस्य असलेल्या सुशांत सिंहनं आलोकनाथ यांनी सिंटाच्या कारणे दाखवा नोटिसीला उत्तर दिल्याचे स्पष्ट केले आहे. अनेक जणांनी आलोक नाथ यांच्याविरोधात मतप्रदर्शन केले असून एक संस्था म्हणून सिंटा योग्य निर्णय घेईल असे सुशांत सिंह म्हणाला आहे.