News Flash

बीग बींच्या लव्हस्टोरीची ४६ वर्षे

या जोडीला बॉलिवूडमध्ये 'गोल्डन कपल' म्हणून ओळखलं जातं

भारतीय संस्कृतीमध्ये विवाहसंस्थेला मोठं स्थान आहे. त्यातच संसार म्हणजे बैलगाडीच्या दोन चाकाप्रमाणे असतो. एक चाक जरी निसटलं तरी संसाराची गाडी डगमगायला जास्त वेळ लागत नाही. त्यामुळे संसाराचा गाडा व्यवस्थित हाकायचा असेल तर नात्यात विश्वास, प्रेम, सामंजस्य या गोष्टी असणं गरजेचं आहे. मात्र या साऱ्याचा कलाविश्वातील सेलिब्रिटींमध्ये चांगलाच अभाव असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे आजवर कलाविश्वातील असंख्य जोडपी मतभेदामुळे विभक्त झाली आहेत. या साऱ्यामध्ये असेही काही सेलिब्रिटी आहेत जे गेले अनेक वर्ष एकमेकांची साथ देताना दिसून येतात. यातील एक जोडी म्हणजे अभिनेता अमिताभ बच्चन आणि जया बच्चन. बॉलिवूडमधील या लोकप्रिय जोडीच्या लग्नाचा आज ४६ वा वाढदिवस.

ग्लॅमरच्या झगमगाटामध्ये आजवर अनेक जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मात्र या साऱ्यामध्ये संसार कसा करावा आणि तो कसा टिकून ठेवावा याचं उत्तम उदाहरण म्हणजे बिग बी आणि जया बच्चन. त्यामुळे त्यांची लव्हस्टोरी आणि ४६ वर्ष एकमेकांना दिलेली साथ नक्की कशी असावी याविषयी साऱ्यांना उत्सुकता आहे.

बॉलिवूडच्या सर्वाधिक यशस्वी जोड्यांपैकी एक असलेल्या अमिताभ आणि जया यांची लव्ह स्टोरी रंजक आहे. अमिताभ बच्चन आणि जया हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. मात्र महाविद्यालयीन शिक्षण सुरु असताना जया अमिताभ यांच्या प्रेमात पडल्या. त्यातच त्या पुण्यात शिक्षण घेत असताना बिग बी त्यांच्या पहिल्या सात हिंदुस्तानी या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी पुण्यात आले होते. विशेष म्हणजे अमिताभ यांना पाहताच जया यांच्या मैत्रिणींनी त्यांना चिडवून प्रचंड त्रास दिला होता. त्यानंतर बिग बींप्रमाणेच जया यांचीही पावले चित्रपटसृष्टीकडे वळाली. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर जया यांनी हृषिकेश मुखर्जी यांच्या गुड्डी या चित्रपटामध्ये अमिताभ यांच्यासह स्क्रिन शेअर केली. त्यानंतर या दोघांची जवळीक झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. विशेष म्हणजे एकत्र राहण्याच्या आणाभाका घेतलेल्या या दोघांनी ३ जून १९७३ साली लग्नगाठ बांधली.

लग्नानंतर जया आणि बिग बी यांच्या आयुष्यात अनेक वादळं आली.मात्र, या साऱ्याला ते खंबीरपणे सामोरे गेले. याच दरम्यान, अमिताभ आणि रेखा यांच्या लव्हस्टोरीचीदेखील जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे जया आणि बिग बी यांचं वैवाहिक आयुष्य धोक्यात आले होते. मात्र या संकटावरही त्यांनी एकत्र मात केली. त्यामुळेच त्यांचा आज ४६ वर्ष संसार सुरळीतपणे सुरु आहे. विशेष म्हणजे या जोडीला बॉलिवूडमध्ये ‘गोल्डन कपल’ म्हणून ओळखलं जातं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 3, 2019 12:04 pm

Web Title: amitabh and jaya bachchans 46th anniversary story
Next Stories
1 Video : भरधाव वेगात बाईक चालविणाऱ्या रोहित शेट्टीचा व्हिडिओ पाहिलात का ?
2 …अन् सलमानसाठी वडिलांनी भोगली उन्हात उभं राहण्याची शिक्षा
3 वीरु देवगण यांना पंतप्रधान मोदींकडून आदरांजली
Just Now!
X