बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्रस्त आहेत. नुकतंच त्यांना यकृताच्या त्रासामुळे रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांचं यकृत केवळ २५ टक्केच कार्यरत असल्याचं त्यांना यापूर्वीच सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या ते आराम करत असून त्यांनी त्याचे अनेक कार्यक्रम रद्द केले आहेत. यामध्येच कोलकातामध्ये होणाऱ्या “कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल”मध्ये उपस्थित राहता येणार नसल्यामुळे त्यांनी येथील नागरिकांची माफीही मागितली आहे.

अमिताभ बच्चन कोलकातामध्ये होणाऱ्या “कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये सहभागी होणार होते. मात्र तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना या फेस्टीव्हलमध्ये उपस्थित राहता येणार नाहीये. यासाठी त्यांनी येथील चाहत्यांची माफी मागितली आहे.

“यावेळी मी कोलकाता इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हलमध्ये असतो. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे मला बेडवर पडून रहावं लागत आहे. आजारपणामुळे मला कोलकातामध्ये येता येणार नाही त्यामुळे मी येथील नागरिकांची मनापासून माफी मागतो”, असं बिग बी म्हणाले. विशेष म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बिग बींच्या मेसेजवर रिप्लाय दिला आहे.

“अमिताभ बच्चन यांनी आणि जया बच्चन यांनी माझ्याशी संपर्क साधला होता.याविषयी त्यांनी मला सविस्तर सांगितलं असून त्यांच्या निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी मी प्रार्थना करेन. आज ते इथे येऊ शकत नाही मात्र त्यांचं सारं लक्ष या कार्यक्रमामकडे असेल. खरं तर हा फेस्टिव्हल त्यांच्याशिवाय करणं याची कल्पनाच आम्ही करु शकत नाही”, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं.दरम्यान, या फेस्टिव्हलमध्ये शाहरुख खानसह कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटी सहभागी झाले. हा फेस्टिव्हल १५ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे.