28 February 2021

News Flash

फ्लॅशबॅक : ‘कुली’ पुन्हा ड्युटीवर…

अमिताभने कॅमेर्‍याकडे पाहिले. सभोवार नजर टाकली.

अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन २६ जुलै १९८२ रोजी ‘कुली’च्या बंगलोर येथील सेटवर पुनीत इस्सारचा ठोसा चुकवण्याच्या प्रयत्नात टेबलाचा कोपरा पोटात घुसून आपल्याला झालेल्या अपघाती आजाराबाबत आजही भावूक होत बोलतो हे ‘ठाकरे ‘ चित्रपटाच्या टीझर प्रकाशन सोहळ्यात पुन्हा जाणवले. असो, त्या आजारपणातून तो बरा होऊन पुन्हा चित्रपटसृष्टीत परतायला सहा महिन्यांचा कालावधी गेला. ७ जानेवारी १९८३ चा तो दिवस. निर्माता-दिग्दर्शक मनमोहन देसाईंकडून ‘कुली’च्या सेटवर अमिताभ बच्चन या संदर्भातील आमंत्रण हाती येताच, आता अमिताभ पहिल्यासारखाच कमालीचा आत्मविश्वासी व फिट दिसतोय काय हे पाहणे, जाणून घेणे महत्त्वाचे होते.

चांदिवली स्टुडिओत सकाळी अकरा वाजता अमिताभचे पुनरागमन होणार होते. अमिताभ कमालीचा वक्तशीर असला तरी आजचा दिवस अपवाद ठरणे स्वाभाविक होते. मनमोहन देसाई यांची मात्र विलक्षण चलबिचल जाणवली. सेटवर हमालाच्या रुपातील अनेक जुनियर आर्टिस्ट होते. मनजींच्या कंपूतील काही फिल्मवालेही आले. पण उपस्थित प्रत्येकाच्या नजरेत अमिताभला कधी बरे पाहतोय, आज तो कॅमेर्‍यासमोर कसा वावरतोय हेच जाणून घेणे होते. मिडियासाठी बसण्यास वेगळी व्यवस्था नसल्याचे पत्थ्यावर पडले. सेटवरच्या वाढत्या गर्दीत कुठेही ये-जा करता येत होते. मनजींच्या चित्रपटाला साजेसे हे वातावरण होते.

तेवढ्यात पुनीत इस्सार तयार होऊन आला आणि आता लवकरच अमिताभचेही सेटवर आगमन होईल असे वाटले. मनजींच्या सहाय्यकानी पुनीत इस्सार तसेच इतर ज्युनियर आर्टिस्टना दृश्य समजावून सांगितले. केवल शर्मा तेव्हा अॅक्टिंग करे नंतर तोही मनजींचाच सहाय्यक झाला. त्याला आपण अमिताभच्या अगदी शेजारीच आहोत हे समजताच तो सुखावला. सेटवरील घटनांचा ऑंखो देखा हाल असा छोट्या छोट्या गोष्टीतून रंगतो.

तेवढ्यात अमिताभ आला. फोटोग्राफर सरसावले. तो थोडासा उतरलेला दिसला. अर्थात ते स्वाभाविक होतेच. खूप दिवसांनी आपण फिल्मी वातावरणात आल्याचे त्याच्या देहबोलीतून प्रकर्षाने जाणवत होते. सगळ्यांच्या नजरेत अमिताभबद्दल सहानुभूती व विश्वास दिसत होता. मनजींनी अमिताभचा आत्मविश्वास वाढवण्यासाठीच की काय, ज्या दृश्याच्या चित्रीकरणात अमिताभच्या पोटात पुनीत इस्सारचा ठोसा बसला त्याच दृश्यापासून सुरुवात केली. अमिताभने कॅमेर्‍याकडे पाहिले. सभोवार नजर टाकली. मनजींकडून काही गोष्टींवर हलकीशी चर्चा केली. एकूणच वातावरणात वेगळाच फिल जाणवत होता. सायलेन्स… मनजी जोरात म्हणाले आणि एका वेगळ्याच घटनेला आपण साक्षी राहतोय हे जाणवले. लाईट्स….. कॅमेरा…..अॅक्शन, मनजींच्या आवाजात किंचित कापरं जाणवले. सेटवर प्रचंड शांतता होती. पण अमिताभ पुन्हा वादळ निर्माण करण्यास सज्ज झाला. पहिल्याच टेकमध्ये मनजींनी शॉट ओ.के. करताच प्रचंड टाळ्या झाल्याच पण अमिताभच्या चेहर्‍यावरचे हायसे व त्यासह हास्य जास्त महत्वाचे होते. फोटोग्राफरचा अमिताभला गराडा पडला. फिल्मवाले त्याला शुभेच्छा देण्यास सरसावले. ते दिवस अमिताभ मिडियात कोणालाच मुलाखत न देण्याचे होते. मात्र त्याने शुभेच्छा स्वीकारल्या. तो सगळाच प्रसंग आजही आठवतोय. कारण अमिताभचा जणू पुनर्जन्म झाल्यानंतरचा चित्रपटसृष्टीतील हा पहिलाच दिवस होता.
दिलीप ठाकूर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2018 4:55 am

Web Title: amitabh bachchan come back to film industry movie coolie
Next Stories
1 दीपिका- रणवीर लग्न करण्याच्या तयारीत?
2 डिझेल इंजिन, सलमान आणि आनंद महिंद्रांचे मार्मिक ट्विट
3 मनोरंजनाचं वादळ परत येतंय
Just Now!
X